डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथांचे दर्दी होते – डॉ. बी. डी. चव्हाण
महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रित्यर्थ व्याख्यानमाला संपन्न
Shreyash Wankhede
पुस्तके ही ज्ञानरूपी घराची दारे आहेत. माणसाजवळील विद्या कोणत्या वेळी कोणता प्रभाव घडविल हे सांगता येत नाही. तिचे मूल्य आखता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणावर विश्वास होता. त्यांना जिथे ग्रंथ दिसायचे तिथे ते थांबायचे. जणू ग्रंथ हे त्यांचा श्वास होता, जीव की प्राण होता. भारतातील व अनेक विदेशातील ग्रंथालयात त्यांची ओळख होती. ते ग्रंथांचे दर्दी होते असे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले. तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समारोपाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. मंचावर डॉ. पल्लवी जुनघरे, श्री. प्रकाश मेश्राम यांची उपस्थिती होती. पुढे ते म्हणाले डॉ. आंबेडकर हे समग्र क्रांतीचे अग्रदूत आहेत ते एक ग्रंथप्रेमी होते . त्यांनी केवळ ग्रंथासाठी प्रशस्त राजगृह बांधले.
12 एप्रिल 2024 ला घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ‘ या विषयावर डॉ. प्रमोद शंभरकर (राज्यशास्त्र विभाग) सरदार पटेल महाविद्यालय यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान पार पडले. 13 एप्रिल, 2024 रोजी डॉ. मृदुला जांगळेकर (मराठी विभाग), डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर यांचे ‘राष्ट्रप्रेमी डॉ. आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झाले. तर 14 एप्रिल, 2024 रोजी या व्याख्यान मालेचा समोरोपीय कार्यक्रम पार पडला. या तिन दिवसीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्र. प्राचार्य, डॉ. बी. डी. चव्हाण होते. या निमित्ताने महाविद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व गीत गायन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन प्रा. रोशन फुलकर यांनी तर आभार डॉ. पल्लवी जुनघरे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.