श्रेयश वानखेडे:
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी भाजपाने राज्यभरात जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने, ब्रह्मपुरी शहर व तालुका मंडळाचे अधिवेशन दुर्गा मंगल कार्यालयात पार पडले. या अधिवेशनाला भाजपा नेते आणि माजी आमदार प्रा. अतुल देशकर आणि चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
अधिवेशनात भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व इतर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रा. अतुल देशकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना ब्रह्मपुरी विधानसभेवर भाजपाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी अविरत प्रयत्न करण्याचे आवाहन केले. “महायुती सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा फायदा घेत, जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.
भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या खोट्या प्रचाराला ठोस उत्तर देण्याची गरज व्यक्त केली. “ही निवडणूक भाजपा साठी ‘करो या मरो’ची परिस्थिती निर्माण करणारी आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन, मनभेद आणि मतभेद बाजूला ठेवून भाजपाच्या विजयासाठी कार्यरत राहावे,” असा संदेश त्यांनी दिला.
अधिवेशनाच्या प्रारंभी, मागील पाच वर्षांत निधन झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी कारभाराचे अभिनंदन करणारा ठराव तालुकाध्यक्ष अरुण शेंडे यांनी मांडला, ज्याला सर्व उपस्थितांच्या सहमतीने मंजुरी मिळाली.
या अधिवेशनात ब्रह्मपुरी तालुक्यातील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ५६०६९ अर्ज मंजूर करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या प्रा. देशकर यांचा भाजपा महिला आघाडीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी भाजपा, भाजयुमो, महिला आघाडी आणि अन्य आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान गांधी नगर येथील युवकांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवत प्रा. देशकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला.
अधिवेशनाच्या प्रत्येक क्षणातून, भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठीचा निर्धार आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या यशासाठीचे प्रबळ प्रयत्न स्पष्टपणे दिसून आले.