श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रविवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. घोडपेठ गावाजवळ चंद्रपूर आरटीओच्या एमएच ०४ केआर ६४३४ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने दोन गायींना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका गायीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या गायीची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची धडक इतकी जोरदार होती की, स्कॉर्पिओचा पुढचा भाग, बंपर आणि लाईट पूर्णपणे खराब झाले. या वाहनाचा वापर आरटीओ कडून सुट्टीच्या दिवशी परिसरात ट्रक व इतर वाहनांचा पाठलाग करून अवैध वसुली करण्यासाठी केला जात होता.
या घटनेनंतर गाय मालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांवर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आणि धमक्या दिल्याचा आरोप केला. स्थानिक भद्रावती पोलीस ठाण्यात बोलावून गाय मालकांवर दबाव आणल्याचा आरोपही केला जात आहे.
या घटनेमुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरटीओ अधिकारी व वाहन चालकावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.