Saturday, March 14, 2026
HomeFraudमहाकाली यात्रेच्या आरक्षित भूखंडाची विक्री
spot_img

महाकाली यात्रेच्या आरक्षित भूखंडाची विक्री

महाकाली यात्रेच्या आरक्षित भूखंडाची विक्री

श्रेयश वानखेडे:
महाकाली यात्रेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा अवैध प्रकार उघडकीस आले असून या प्रकरणात पाच जणांविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  आरोपींमध्ये युवराज बनकर, प्रशांत बनकर, इंदूबाई बनकर, प्रभाकर बनकर आणि किशोर बनकर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ व ५३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
        महाकाली यात्रा विदर्भातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे, जिथे लाखो भाविक महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांतून येतात. यासाठी शहरातील सर्वे क्रमांक २५५ हा भूखंड यात्रेसाठी खास आरक्षित ठेवला होता. मात्र, या आरक्षित भूखंडावर आता पक्की घरे बांधली जात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी या संदर्भात तातडीने कारवाई करत बांधकाम करणाऱ्या २६ जणांना नोटीस बजावली. मात्र, या नोटीसकडे दुर्लक्ष झाल्याने तीन वेळा नोटीस देऊनही बांधकाम थांबले नाही.
       या प्रक्रियेत युवराज बनकरने अवैधरीत्या अभिन्यास तयार करून भूखंडाची विक्री केली. महापालिकेने मंजूर केलेला अभिन्यास न घेता बनकरने अवैध विक्रीपत्र तयार केले आणि सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मदतीने सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली. महसूल विभागाने देखील या प्रक्रियेत फेरफार करून बनकर यांच्या कारनाम्याला हातभार लावल्याचे समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणात काही महसूल अधिकारी आणि सहाय्यक दुय्यम निबंधक यांची चौकशी सुरु आहे.
         युवराज बनकर आणि इतर आरोपींनी महाकाली यात्रेसाठी आरक्षित भूखंडाची विक्री करून २६ जणांकडून पैसे उकळले. विशेष म्हणजे, हा भूखंड पूर्वी व्यंकटेश देवस्थानच्या नावावर होता. मात्र, महाकाली यात्रेसाठी ही जागा आरक्षित करण्यात आली होती, याची कल्पना असतानाही जागेची विक्री केली गेली. स्थानिकांचे आरोप आहेत की, महसूल विभागातील काही अधिकारी आणि सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाने या विक्रीसाठी सहकार्य केले आहे.
       शहर पोलिस ठाण्यात याबाबत सखोल चौकशी सुरू असून, भविष्यात आणखी काही अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. महाकाली यात्रेचा भूखंड विकणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page