प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा कटाक्षाने वापर करावा.- डॉ. बी. डी. चव्हाण
म.ज्यो.फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न
श्रेयश वानखेडे:
भाषा हे विकासाचे साधन आहे. भाषेचा प्रश्न केवळ अभिमानाचा नसून अस्तित्वाचा आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार केली पाहिजे हा कवी कुसुमाग्रजानी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. मराठी भाषेच्या विकासाची गती वाढविणे, ही आवश्यक बाब आहे. कोणत्याही भाषेचा विकास होण्याच्या कामी राजकीय व आर्थिक पाठबळाची गरज असते. मराठी दरबाराची, कारभाराची, ज्ञानव्यवहाराची, कर्माची भाषा झाली पाहिजे. भाषेच्या विकासाची जबाबदारी ही सर्वांची आहे. किंबहुना भाषा ही कृती व गतीतून सिद्ध होत असते. मराठी भाषा वर्धमान करण्यासाठी प्रत्येकानी व्यवहारात तिचा कटाक्षाने व जास्तीत जास्त वापर करावा असे प्रतिपादन प्रा. डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले.
स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. एस. एस. कर्णसे होते. तळागाळातील समाजापासून अनुभवांचा विस्तार बोलिभाषेतून मराठीत आला पाहिजे. त्याला प्रतिष्ठेचे स्थान मिळाले पाहिजे. मराठीवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या पातळीवर देखील या गोष्टींचा आग्रह व्हायला पाहिजे. प्रसारमाध्यमे, सामाजिक प्रबोधनाच्या चळवळी, संस्था कार्यकर्ते या सर्वांनी यासाठी आग्रही भूमिका घ्यावी. असेही ते म्हणाले. प्रा. कर्णसे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मराठी भाषेचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर चौरे यांनी तर आभार प्रा. दीपक भगत यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.