भारत विश्वगुरू पदाकडे वाटचाल करीत आहे : मुग्धा पाठक
राष्ट्र सेविका समिति बल्लारपूर नगर विजयादशमी उत्सव संपन्न
Jyotsna Wankhede: देश आपल्याला खूप काही देत असतो, आपणही देशाला काही दिले पाहिजे म्हणून समाजामध्ये राष्ट्रभाव जागृत झाला पाहिजे जो नित्य संस्कारातून होईल. समाजातील परस्परांमधील मतभेद दूर सारून विसंवादातून संवादाकडे वाटचाल करावी. स्त्री ही कुटुंब समाज आणि राष्ट्राची आधार शक्ती आहे त्यामुळे स्त्रियांची अधिक जबाबदारी आहे. समाजाच्या त्याग आणि समर्पणातूनच भारत विश्वगुरू पदाकडे वाटचाल करीत आहे. असे प्रतिपादन सौ.मुग्धा पाठक यांनी केले. त्या राष्ट्र सेविका समिति बल्लारपूर नगर विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. हा उत्सव जनता विद्यालयाच्या प्रांगणात शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ ला सायं. ०४.३० वा. पार पडला.
उत्सवाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि शस्त्र पूजन करून झाली. ध्वजारोहण व प्रार्थना झाल्यानंतर पाहुण्यांचा परिचय व स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंचावर जिल्हा कार्यवाहीका सौ अस्मिता गडकर, नगर कार्यवाहीका सौ अंजली वाघे प्रमुख अतिथी सौ सीमा खानोरकर व प्रमुख वक्त्या सौ मुग्धा पाठक उपस्थित होते. यानंतर बल्लारपूर नगर कार्यवाहीका सौ. अंजली वाघे यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात समिती बद्दल माहिती दिली. यानंतर काही शारीरिक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले यामध्ये दंडयोग, नियुद्ध, मनोरे, सेविकांनी सादर केले. सौ अमिता बोनगीरवार यांच्या नेतृत्वात सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक झाले. त्याचसोबत दंड आणि सांघिक व्यायाम योगांचे सुद्धा प्रात्यक्षिक झाले
आजची पिढी कितीही मोठी झाली वा कितीही मोठ्या पदावर गेली तरीही त्यांना मातृ पितृ ऋण फेडायचे आहे याची जाणीव असू द्यावी. आजच्या बाल आणि तरुण पिढीवर असे संस्कार होणे आवश्यक आहे की त्यांनी आपल्या पालकांचा आदर करावा आणि आई-वडिलांना कधीही विसरू नये. असे मनोगत प्रमुख अतिथी सौ सीमा खानोरकर यांनी व्यक्त केले.
तत्पूर्वी काही बौद्धिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये सांघिक गीत झाले. एकल गीत सौ सपना बोनगिरवार यांनी सादर केले. सुभाषित पूर्वा गोविंदवार आणि अमृत वचन अलका मोहितकर यांनी सादर केले. संपूर्ण उत्सवाचे सूत्रसंचालन नयना दिवटे यांनी केले. अपूर्व भालेराव यांनी गायलेल्या वंदे मातरम या गीताने उत्सवाची सांगता झाली.
या उत्सवाकरिता अवंतिका साखरकर, आराध्या गोंदे, अदिती मिश्रा, मीनल चिताडे, दिपाली भालेराव, अंबिका गोंदे, इत्यादी सेविकांनी पथक परिश्रम केले.