कर्तव्य हाच परमेश्वर.., शाळा हेच मंदिर ..,
विद्यार्थी हे दैवत..,अध्यापन ही उपासना ..,
ज्ञानदान हेच श्रेष्ठदान, विद्यार्थी घडविणे ही पूजा.., अन्
विद्यार्थी विकास हेच पुण्यकर्म असे मानून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथून आपल्या 33 वर्षे 10 महिने शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावून निवृत्त होणारे मुख्याध्यापक श्री. बंडुजी किसन लांडे म्हणजे एक चालते बोलते विद्यालय होय …!
शिक्षकी पेशा ही केवळ नोकरी न समजता शिक्षक म्हणजे समाज घडविणारा दुवा.. ज्ञानदान करणारा सेवक असे मानून कर्तव्य पार पाडणारी आदर्श व्यक्ती..!
बल्लारपूर तालुक्यातील कोलगाव येथे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात 10/10/1967 ला सरांचा जन्म झाला. त्यानंतर कोलगाव येथे प्राथमिक तथा कढोली येथे माध्यमिक शिक्षण घेतले तसेच महाविद्यालयीन शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे घेऊन त्यांनी चार विषयात मास्टर डिग्री प्राप्त केली असे श्री. बंडुजी किसन लांडे यांनी डब्ल्यूसीएल मध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून दोन वर्ष सेवा केली परंतु त्यांचे मन त्या कामात रमले नाही. चक्क पगारी नोकरी सोडून ते पवित्र अशा ज्ञानदानाच्या कार्यासाठी जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथे 01/01/1992 ला सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत झाले.
आई सौ. राधाबाई , वडिल किसनराव यांनी लांडे सरांच्या शिक्षणाकामी मोलाचे सहकार्य केले आणि समाजात एक आदर्श शिक्षक म्हणून उभे राहण्याचे बळ दिले. तसेच पत्नी सौ. सीमा यांनी घरकाम सांभाळून सासू – सासरे यांची सेवा करत लांडे सरांना मोलाची साथ दिली.
सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर केवळ पोटापाण्यासाठी नोकरी न करता विद्यार्थी घडविण्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले.
पुढे लांडे सरांना मंडळाने मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती दिली. प्रथम साखरवाही येथे दोन महिने त्यानंतर स्व शाळेत जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथे दिनांक 01/10/2021 ला मुख्याध्यापक म्हणून कार्य सुरू केले.
त्यांची दूरदृष्टी, नवनवे प्रयोग करून यश मिळविण्याची इच्छाशक्ती, वेगवेगळ्या कल्पना अमलात आणणे, धडपड या सूत्रानुसार लांडे सरांनी आपला मुख्याध्यापक पदाचा प्रवास सुकर केला.
मुलांबरोबर केवळ अभ्यासातच नव्हे तर त्यांच्या इतर गुणांमध्ये रमताना त्यांच्याशी जवळीक साधून मुलांच्या कलाने त्यांना घडविण्यासाठी लांडे सरांनी नेहमीच प्रयत्न केले.
केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर बाहेरील जगाचे ज्ञान देणारे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सामाजिक, व्यवहारिक ज्ञान ज्ञात करून देण्याकडे त्यांचा जास्त कल असायचा.
शाळेचा विकास हेच ब्रीदवाक्य घेऊन चालणारे लांडे सर यांनी ग्रामस्थ मंडळ आणि गावातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पालक वर्ग माजी विद्यार्थी आदींच्या सहकार्याने दिवस-रात्र झटून निधी उभा केला आणि स्मार्ट डिजिटल शाळा उभारण्यासाठी मोलाची कामगिरी केली.
शाळेत विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असायची. शिक्षक म्हणून शालेय कामांना प्रथम प्राधान्य देत त्यांनी सामाजिक, आध्यात्मिक कार्यातही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
लांडे सरांनी जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. वरिष्ठ- निवड श्रेणी तसेच इंग्लिश या विषयाचे शिक्षकांना प्रशिक्षण दिले.
तन, मन, धन अर्पून शिक्षण क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून श्री. लांडे सरांकडे पाहिले जाते.
मुख्याध्यापक व शिक्षक म्हणून नेहमीच क्रियाशील, कार्यमग्न असणारे लांडे सर दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांना भावी आयुष्यासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…!!
डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते
गणित विज्ञान मित्र
जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर