ज्ञानाचे खरे उपयोजन

काल-परवा मी रोडपाली येथून खारघरला ऑटोरिक्षाने जात होतो. सोबत माझी मुलगी व नात ह्या दोघी होत्या. नातीची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जात होतो. डॉक्टरने सायंकाळी सहाची वेळ दिली होती. तथापि, थोडे अगोदर निघावे म्हणून आम्ही घरून ठिक 5.15 वाजताच निघालो. आमच्या रिक्षासमोर एक पिवळ्या रंगाची स्कूल बस धावत होती. जोपर्यंत मोठ्या रस्त्याने आम्ही जात होतो, तोपर्यंत कांही विचार करण्यासारखे नव्हतेच. अनेक गाड्या एकापाठोपाठ धावत होत्या इतकेच. पुढे रस्ता उड्डाणपुलाखालून जाणार होता. त्यामुळे बसच्या ड्रायव्हरने डावीकडून खालच्या रस्त्याने बस टाकली. आमच्या रिक्षाचालकांनी सुद्धा बसच्या मागोमाग रिक्षा टाकली. पुलाखालून उजवीकडे जाणारा बोगदावजा रस्ता होता. जशी बस त्या बोगदावजा रस्त्याकडे वळली, माझ्या काळजात धस्स झालं. त्याला कारणही असं होतं की, बसचा वरचा टॉप व त्या बोगदावजा रस्त्याची उंची यात फक्त 1 /2 इंच अंतर होते. मला वाटले ही बस वरच्या टॉप मध्ये अडकणार. बसच्या ड्रायव्हरला रोजचा रस्ता असल्यामुळे खात्री असणार. त्यामुळे त्याने आत्मविश्वासाने बस टाकली व रस्ता पार केला सुद्धा. माझी रिक्षाही त्याच मार्गाने पुढे बसच्या मागोमाग चालत होती. त्यामुळे बस बाहेर पडेपर्यंत मी जवळजवळ श्वास रोखून पाहत होतो. तसे पाहिले तर माझा त्या बसमधील विद्यार्थ्यांशी किंवा बस चालकाशी काही संबंध नव्हता. तथापि, मी नुकत्याच वाचलेल्या एका घटनेच्या वृत्तामुळे कांही क्षणासाठी विचलित झालो होतो.
एका शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एका छानशा सहलीचे आयोजन केले होते. विद्यार्थी अत्यंत आनंदात होते. बस जात होती. बस मधील विद्यार्थी हसत खिदळत प्रवास करीत होते. रस्ता घाटाचा, निमुळता व वळणावळणाचा होता.
अशातच रस्त्यावर एक बोगदा लागला. बोगद्याच्या बाहेर फलकावर बोगद्याची उंची लिहिली होती. गाडीची उंचीही तेवढीच असल्यामुळे आणि त्या चालकानेही अनेक वेळा त्या बोगद्यातून बस नेलेली असल्यामुळे बोगद्यातून बिनधास्तपणे बस टाकली. मात्र यावेळी बस बोगद्यात अर्धी गेल्यानंतर बोगद्याच्या छताला घातल्या गेली आणि बोगद्याच्या अर्धी आत व अर्धी बाहेर अशी अडकली. आता बस मागेही येत नव्हती व पुढेही जात नव्हती.
बसचा टफ बोगद्याच्या छताला घासला त्यावेळी खूप मोठा आवाज झाला. आवाजाने सर्व विद्यार्थी घाबरले. सोबतचे शिक्षक विद्यार्थ्यांना धीर देत होते. कांही शिक्षक बस चालकावर ओरडत होते. चालक सांगत होता की, मी आजपर्यंत शेकडो वेळा या रस्त्याने हीच बस घेऊन गेलो आणि आलो आहे. कधीच असे घडले नाही, आजच पहिल्यावेळी असे घडले आहे.
बसचा आवाज ऐकून आसपासचे लोक बस भोवती जमा झाले होते. त्यापैकी एकाने सांगितले. यावर्षी रोडवर खडीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे खालून रस्ता थोडा उंच झाला आहे, त्यामुळे बस फसली. यापूर्वी अशा प्रकारच्या गाड्या विनाअडथळा जात होत्या.
बोगद्यामध्ये बस अडकल्यामुळे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गाड्या अडकून पडल्या. कांही वेळातच एक किलोमीटर पर्यंत गाड्यांची रांग लागली. प्रत्येक गाडीमधील प्रवासी बस जवळ यायचा, निरखून पाहायचा आणि असं करा, तसं करा असा सल्ला द्यायचा. काहींनी गाडीला दोरखंड बांधून बस मागे ओढण्याचा सल्ला दिला. तसा प्रयत्नही करून पाहिला गेला. मात्र दोरखंड तुटून पडले. पण गाडी जागची हालली नाही. काहींनी क्रेन मागवा, तर काहींनी रस्ता खोदण्याचा सल्ला दिला, तर काहींनी आणखी बरेच उपाय सुचविले, पण प्रत्येक उपाय आणखी नवीन समस्येला जन्म देणारा होता. क्रेन आणायची तर लांबून आणावी लागणार. त्यासाठी रस्ता मोकळा असणेही आवश्यक होते. येथे तर बसच्या मागे गाड्यांची रांग लागली होती. बसच्या मागे असलेल्या कारला दोरखंड बांधून बस मागे ओढण्याचा प्रयत्न केला, तो फसला होता. विद्यार्थी, शिक्षक, बस चालक व रस्त्यावरील अडकून पडलेले लोक बेचैन झाले होते.
हा सर्व प्रकार त्याच बसमधील एक विद्यार्थी पाहत होता. त्याने आपल्या शिक्षकाला सांगितले.
“आपण बसच्या सर्व चाकांमधील थोडी-थोडी हवा काढून घेऊ. त्यामुळे बसची उंची कमी होईल आणि आपली बस काहीही न करता पुढे निघून जाईल. पुढे योग्य ठिकाणी हवा भरून घेता येईल.” शिक्षकाने बसच्या चालकाला हा सल्ला दिला. त्यालाही ही कल्पना पटली. त्याने पटापट सर्व चाकांमधील हवा कमी केली. बसची उंची त्यामुळे थोडी कमी झाली आणि व्यवस्थितपणे बस बोगद्याच्या बाहेर निघाली. सर्व मुले-मुली बसमध्ये बसले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.
त्या शाळकरी मुलाने सुचविलेला उपाय पाहून तेथे जमलेले सर्व विद्वान अचंब्यात पडले आणि आपल्याला हा उपाय का सुचला नसावा, याबाबत स्वतःलाच दोष देत बसले.
कोणाचे वय किती आहे हा कधीच विषय नसतो. त्याची विचार करण्याची कुवत, त्याचे निरीक्षण व योग्य वेळी त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करण्याची क्षमता वाढविणे हेच तर खरे शिक्षण आहे.
मुलाचा शाळेच्या मुख्याध्यापकाने गौरव केला हे वेगळे सांगायची गरज नाही.
राम पवार
अमरावती
भ्रमणध्वनी : 9284196496
(1 डिसेंबर, 2022)
|
|









