Thursday, April 16, 2026
HomeChandrapurउष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा
spot_img

उष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा

उष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा

Ø पालकमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश ;

Ø नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन

चंद्रपूर( जीमाका): गत पंधरवड्यापासून जिल्ह्यात दैनंदिन तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम थेट मानवी शरीरावर होत असून योग्य काळजी घेतली नाही तर उन्हाच्या तिव्रतेमुळे कधीकधी मृत्युही होऊ शकतो. त्यामुळे उष्माघात नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाययेाजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. नागरिकांनीसुध्दा उन्हापासून संरक्षणासाठी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. 28) उष्माघात नियंत्रण कृती आराखडाबाबत आयोजित बैठकीत डॉ. वुईके बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे आदी उपस्थित होते.

उष्माघाताबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, उष्माघाताची लक्षणे, घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करू नये आदी बाबी नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. उष्माघाताबाबत संपर्क करायचा असल्यास जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक व उष्माघात संपर्क अधिकाऱ्यांची यादी सुद्धा नागरिकांपर्यंत पोहचवा. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांसाठी राखीव खाटा, रेफरल साठी रुग्णवाहिकेची उपलब्धता, कुलरसह थंड खोलीची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस व औषधीसाठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

उष्णतेची लाट : जागतिक हवामान संघटनेनुसार सलग पाच दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस दररोज कमाल तापमान, सरासरी कमाल तापमानापेक्षा 5 अंश सेल्सीअसने जास्त असते, तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. मैदानी भागात तापमान किमान 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर उष्णतेची लाट मानली जाते.

उष्णतेच्या लाटेसंबंधी आजाराची लक्षणे : 1) चक्कर येऊन पडणे, 2) फेफरे किंवा झटके येणे, 3) झोपेतून उठण्यास त्रास होणे / उठता न येणे, 4) गोंधळल्यासारखे बोलणे / वागणे, 5) श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, 6) शरीराचे तापमान 105 अंश फॅरनहिट (40.5 अंश सेल्सिअस) पेक्षा अधिक होणे, 7) स्नायुत पेटके येणे, 8) चिडचीड होणे, 9) डोकेदुखी, अशक्तपणा येणे, 10) मळमळ व उलटी होणे, अधिक घाम येणे.

काय करावे : 1) शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे, 2) डोक्यावर टोपी, रुमाल, टॉवेल किंवा छत्री वापरावी, 3) उन्हात बाहेर जातांना डोळ्यावर गॉगल्स लावावा, 4) कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी कमी तापमानात करावी.

काय करू नये :  1) दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर उन्हात जाणे टाळावे, 2) उन्हात अतिकष्टाची कामे करू नये, 3) दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये, 4) गडद घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे, 5) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खावू नये.

येथे करा संपर्क : उष्माघाताबाबत संपर्क करावयाचा असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर कॉल सेंटर दूरध्वनी क्रमांक 07172 – 250400.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page