Saturday, April 25, 2026
HomeChandrapurचिचपल्लीचे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरसह संपूर्ण देशासाठी आदर्श ठरावे
spot_img

चिचपल्लीचे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरसह संपूर्ण देशासाठी आदर्श ठरावे

चिचपल्लीचे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरसह संपूर्ण देशासाठी आदर्श ठरावे

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चिचपल्लीच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला नवे बळ

संशोधन, प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून केंद्राला नवी दिशा

बांबू फर्निचर, वस्त्रोद्योग, इंधन निर्मिती, सामाजिक उत्तरदायित्व आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांवर विशेष भर


Jyotsna Wankhede : चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे केवळ चंद्रपूरपुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणारे संशोधन, प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीचे सक्षम केंद्र बनावे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्राला केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता संशोधन, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीचे सक्षम केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बांबू फर्निचर, बांबू तंतू, वस्त्रोद्योग, बांबूपासून खाद्यपदार्थ, इंधन निर्मिती, बांबू इंधन गोळे तसेच विविध नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीवर विशेष भर देत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बांबू फर्निचरचा वापर वाढविण्यासाठी शासन निर्णय काढण्याबाबत मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक श्री रामानुजन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्री. शुक्ला, कार्यकारी अभियंता श्री. मुकेश टांगले, कार्यकारी अभियंता पूनम वर्मा, सहसंचालक डॉ. मनोज डायगव्हाणे, डॉ. तारिका दगडकर आदी उपस्थित होते.

यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वनश्री बांबू दालन या बांबू स्मरणिका दुकानाचे उद्घाटन तसेच बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातील इमारतीचा आशियातील उत्कृष्ट वास्तूंमध्ये समावेश होत सिंगापूरमधील प्रतिष्ठित नियतकालिकामध्ये उल्लेख झाल्याचा अभिमान व्यक्त करत, दोन वर्षांच्या खंडामुळे केंद्राची गती मंदावली असली तरी आता नव्या उर्जेने काम सुरू करण्याचे निर्देश आ.मुनगंटीवार यांनी दिले.

या केंद्रात ‘संशोधन’ आणि ‘प्रशिक्षण’ हे दोन महत्त्वाचे घटक असून संशोधनासाठी आवश्यक भौतिक साधनसामग्री, मनुष्यबळ, खर्च आणि उद्दिष्टे स्पष्टपणे निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांबू तंतू, बांबूपासून तयार होणारे कपडे, बांबू फर्निचर, बांबू खाद्यपदार्थ, इंधन गोळे, इंधन निर्मिती, बांबू चटई, विभाजन भिंती, टेबल, कुंपण, पर्यावरणपूरक वृक्षसंरक्षक यांसारख्या उत्पादनांवर संशोधन करण्यावर भर देण्यात आला. वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांमधील अनुदान बांबू उद्योगाशी जोडता येईल का, याचाही अभ्यास करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.

चीन, फिलिपिन्स यांसारख्या देशांमध्ये बांबूपासून होणाऱ्या विविध उत्पादनांचा अभ्यास करण्यासाठी चार ते पाच सदस्यांची विशेष समिती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत पेट्रोलियम कंपन्या, कोल इंडिया, टाटा, सिमेंट कंपन्या तसेच विविध औद्योगिक संस्थांकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न वाढविण्याचेही सांगण्यात आले. निती आयोगाकडे संशोधनासाठी राखीव निधी उपलब्ध होण्यासाठी सविस्तर प्रस्ताव आणि प्रभावी सादरीकरण तयार करून पाठविण्याचे निर्देशही आ.मुनगंटीवार यांनी दिले.

प्रशिक्षण देताना विद्यार्थ्यांना रोजगाराची हमी निर्माण होईल अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करण्यावर भर देण्यात आला. बांबू अभ्यासक्रमांना विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने पदवी स्वरूप देता येईल का, याची तपासणी करण्याचे सांगण्यात आले. तसेच या केंद्राला कौशल्य विकास विभागाशी जोडण्याबाबतही चर्चा झाली. बांबूपासून तयार करण्यात आलेला सात फूट उंच राष्ट्रीय ध्वज प्रधानमंत्री कार्यालयात ठेवण्यात आला असल्याचा उल्लेख करत, केवळ स्मरणिकांपुरते मर्यादित न राहता अधिक नाविन्यपूर्ण उत्पादनांवर भर देण्याची गरज आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

बांबूपासून कुंपण, पर्यावरणपूरक वृक्षसंरक्षक, बस थांबे यांसारखी उपयुक्त निर्मिती करण्याचे निर्देश देण्यात आले. शहराच्या विकास आराखड्यानुसार वृक्षविकास आराखडा तयार करणे तसेच वृक्षलागवडीसाठी स्वतंत्र कायद्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. बांबू वस्तूंची विक्री मोठ्या व्यापारी साखळ्यांमध्ये तसेच विविध विक्री माध्यमांतून वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय व राज्य वीज मंडळांना वीज निर्मितीसाठी बांबू इंधन गोळे उपलब्ध करून देण्याच्या शक्यता तपासण्यास सांगण्यात आले. कोळसा आणि बांबूच्या उष्मांक क्षमतेचाही तुलनात्मक अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.

केंद्रातील रिक्त पदभरतीसाठी मंत्रालयात पदमान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे, संगणक प्रयोगशाळा उभारणे, केंद्राची संकेतस्थळ आणि भ्रमणध्वनी अनुप्रयोग तयार करणे, तसेच आवश्यक भौतिक साधनसामग्रीची यादी तयार करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. बांबूशी संबंधित राज्य व केंद्र शासनाचे आवश्यक नियम, धोरणे आणि कायदे तयार करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

“बांबू हे केवळ वनउत्पादन नाही, तर भविष्यातील हरित अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार आहे. चिचपल्लीचे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे चंद्रपूरसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्श संशोधन, प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीचे केंद्र बनले पाहिजे,” असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page