Monday, August 17, 2026
spot_img
HomeEducationपालकमंत्री व वरिष्ठ अधिका-यांची आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत पंगत

पालकमंत्री व वरिष्ठ अधिका-यांची आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत पंगत

पालकमंत्री व वरिष्ठ अधिका-यांची आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत पंगत

Ø विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून घेतला भोजनाचा आस्वाद;

Ø मनमोकळ्या संवादातून जाणून घेतल्या अपेक्षा

Ø विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी’ – पालकमंत्री

चंद्रपूर( जीमाका): स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद, त्यांच्या हस्ते स्वागत आणि त्यांच्यासोबत जमिनीवर पंगतीत बसून भोजनाचा आस्वाद, अशा आपुलकीच्या वातावरणामुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने आणि जिवतीच्या तहसीलदार रूपाली मोगरकर यांनीही विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केले. प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आणि पाटणचे सरपंच सिताराम मडावी यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद : या शाळेतील चिमुकल्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी मी आज येथे आलो आहे, असे सांगत पालकमंत्री डॉ. उईके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे, या विश्वासाने आई -वडील त्यांना आश्रमशाळेत पाठवतात. त्यामुळे आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, वॉर्डन आणि इतर कर्मचाऱ्यांवर विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे घडविण्याची मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ही एकमेकांशी जोडलेली साखळी आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत नियमित संपर्क ठेवावा. विद्यार्थ्यांनीही आतापासूनच आपल्या भविष्याचा संकल्प करून ध्येय निश्चित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे महिन्यातून एकदा मार्गदर्शन : आश्रमशाळेतील इयत्ता 9 वी, 10 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी, यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उईके यांनी केली.

या आश्रमशाळेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत वरिष्ठ पदांवर पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्यांनाही शाळेत आमंत्रित करावे. त्यांच्या अनुभवाचा आणि यशस्वी वाटचालीचा फायदा सध्याच्या विद्यार्थ्यांना व्हावा, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थी आहेत म्हणून आपली नोकरी आहे : शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. उईके यांनी विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. विद्यार्थी आहेत म्हणून आश्रमशाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, अधीक्षक, वॉर्डन आणि इतर कर्मचाऱ्यांची नोकरी आहे. या विद्यार्थ्यांमुळे आपल्याला पगार मिळतो, याची जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य पद्धतीने घडवा. आपल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊ शकलो नाही, अशी खंत आयुष्यभर राहता कामा नये. उलट विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगले करता आले, त्यांचे भविष्य घडविण्यात आपलाही वाटा आहे, याचे समाधान शिक्षकांना निरंतर मिळाले पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले.

इथे आले म्हणून आज मंत्र्यांशी बोलता आले : विद्यार्थीनीचे मनोगत

कार्यक्रमात इयत्ता 10 वीतील विद्यार्थिनी अंतकला कोठुडे हिने व्यक्त केलेले मनोगत लक्षवेधी ठरले. पालकमंत्र्यांशी संवाद साधताना ती म्हणाली, मी घरी राहिले असते तर कदाचित मला शिकायला मिळाले नसते. आश्रमशाळेत आले म्हणून आज तुमच्यासोबत बोलता आले. मंत्री महोदयांसोबत संपूर्ण प्रशासन आज आमच्या शाळेत आले, याचा आम्हाला खूप आनंद झाला.

जेवण कसे मिळते? शिक्षक नियमित आहेत का? : पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न थेट विचारले. शाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक आश्रमशाळेत राहतात का, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळते का, जेवण कसे मिळते, कोणत्या विषयांचे शिक्षक उपलब्ध नाहीत, अशा विविध प्रश्नांद्वारे त्यांनी शाळेतील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेतील व्यवस्थेबाबत उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.

ई-लायब्ररीचे उद्घाटन; लॅबची पाहणी : यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आश्रमशाळेतील ई-लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी ॲस्ट्रॉनॉमी लॅब आणि मॅथ्स लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक सोयी-सुविधांची माहिती घेतली. आश्रमशाळेतील व्यवस्थेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन सूर्यकांत पुणेकर यांनी केले. यावेळी मोठ्यासंख्येने विद्यार्थी, गावकरी व त्यांचे पालक उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page