*नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळावर पोलीस प्रशासनाने घेतली दखल…*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक २५/०९/२०२६ रोजी चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपूर शहर, दुर्गापूर, या हद्दीतील सार्वजनिक विसर्जन होते. सदर गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘चंद्रपुरचा राजा गणेश मंडळ जटपुरा गेट’ हे मंडळही सहभागी झाले होते. सदर मिरवणुकीदरम्यान चंद्रपुरचा राजा जटपुरा गेट येथे पोहचल्यानंतर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली. यामुळे इतर मागे असलेल्या गणेश मंडळांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. त्यावेळी प्रशासकीय मध्यस्थीनंतर सदर मंडळाला विसर्जन मार्गाकडे रवाना करण्यात आले. व त्यापाठोपाठ इतर मंडळेही विसर्जन स्थळांकडे रवाना झाली.
परंतु सदर मंडळाने विसर्जन न करता श्रींची मुर्ती परस्पर परत मंडपात नेऊन ठेवली. त्यानंतर २६ सप्टेंबर २०२६ रोजी शहरातील सुमारे ५० सार्वजनिक गणेश मुर्तीच्या नियोजित विसर्जन मिरवणुका निघणार होत्या. तत्पुर्वी ‘चंद्रपुरचा राजा’ गणेश मंडळाने दुपारी सुमारे १६/०० वा. प्रशासनाला कोणताही पुर्वकल्पना न देता व परवानगी न घेता अचानक विसर्जन मिरवणुक काढली. यामुळे इतर सार्वजनिक गणेश मंडळाच्या मुख्य विसर्जन मार्गावर अडथळा निर्माण झाला. तसेच दवा बाजार, केवळराम चौक, रामसेतु पुल ते विसर्जन पॉईंट हा रस्ता रुग्णवाहीका, नागरीक व वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता आहे. विनापरवानगी काढलेल्या या मिरवणुकीमुळे सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली, ज्याबाबत नागरीकांकडुन अनेक तक्रारी प्राप्त झाल्या.
याशिवाय विसर्जन स्थळी पोहोचल्यानंतरही सुमारे २ ते ३ तास विसर्जनासाठी वेळ घालवण्यात आल्याने मागे असलेल्या इतर सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा त्रास सहन करावा लागला. व त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोलीस स्टेशन रामनगर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर अंतर्गत २६ सप्टेंबर २०२६ रोजी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, प्रशासनाची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता मिरवणुक काढणे तसेच विसर्जनास विलंब लावल्याप्रकरणी प्रशासनाकडुन गांभीर्याने दखल घेवुन चंद्रपुरचा राजा गणेश मंडळ जटपुरा वार्ड येथील पदाधिकारी व सदस्य यांचेवर पो.स्टे. अप क्र. ११३६/२०२६ कलम २२३, २८५ भारतीय न्याय दंडसंहीता, सहकलम १३५, १३८ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनातर्फे यापुढेही योग्य ती उचित कारवाई करण्यात येत आहे.