चंद्रपूरच्या विकासाला केंद्रीय बळ, माइनिंग टुरिझमसह विविध मागण्यांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांची केंद्रीयमंत्र्यांशी भेट.
केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासमोर मांडले चंद्रपूरच्या विकासाचे विविध विषय
*Jyotsna Wankhede*:
चंद्रपूरच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेत चंद्रपूर मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. चंद्रपूरमधील बंद भूमिगत व ओपन कास्ट कोळसा खाणी, ओव्हरबर्डन डम्प्स तसेच डब्ल्यूसीएलच्या वापरात नसलेल्या उपलब्ध जमिनींचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करून ‘माइनिंग टुरिझम’ला चालना देण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी यावेळी केली. या सर्व विषयांवर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.
चंद्रपूरची ओळख कोळसा उद्योग आणि खाण क्षेत्राशी जोडलेली आहे. जिल्ह्यात भूमिगत तसेच ओपन कास्ट खाणी, मोठ्या प्रमाणात ओव्हरबर्डन डम्प्स आणि डब्ल्यूसीएलच्या विविध ठिकाणी उपलब्ध जमिनी आहेत. या उपलब्ध संसाधनांचा केवळ औद्योगिक वापर न करता पर्यटनाच्या माध्यमातूनही उपयोग करता येऊ शकतो. यासाठी कोल इंडियाने स्वतंत्र ‘माइनिंग टुरिझम पॉलिसी’ तयार करावी, अशी भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडली.
खाण क्षेत्राशी संबंधित स्थळांचा नियोजनबद्ध पद्धतीने पर्यटनासाठी विकास झाल्यास चंद्रपूरमध्ये माइनिंग टुरिझमचे नवे केंद्र विकसित होऊ शकते. यातून स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते. त्याचबरोबर डब्ल्यूसीएलच्या उपलब्ध मालमत्तेचा योग्य वापर, देखभाल आणि संरक्षणही प्रभावीपणे करता येणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
यासोबतच चंद्रपूरमध्ये इको-पार्क विकसित करण्याची मागणीही आमदार जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली. कोळसा खाण क्षेत्राशी संबंधित उपलब्ध जागांचा पर्यावरणपूरक पद्धतीने विकास करून नागरिकांसाठी पर्यटन व मनोरंजनाची सुविधा निर्माण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
डब्ल्यूसीएल च्या वापरात नसलेल्या जमिनीवरील निवासी संरचनांबाबत कायमस्वरूपी लीजहोल्ड अधिकार देण्याचा विषयही आमदार जोरगेवार यांनी केंद्रीय मंर्त्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. या माध्यमातून संबंधित नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडलेल्या विविध विषयांवर केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. संबंधित विषयांचा आवश्यक पातळीवर विचार करून लवकरच योग्य निर्णय घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.
चंद्रपूरच्या विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न थेट केंद्रीय स्तरावर मांडत त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने माइनिंग टुरिझम, इको-पार्क आणि डब्ल्यूसीएलच्या जमिनींसंबंधीच्या प्रश्नांना आगामी काळात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.