चंद्रपूर नगरात १७ ऑक्टोबरला श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन
**राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी उत्सव; अरुण नारायण तिखे प्रमुख अतिथी, मंगेशजी भेंडे प्रमुख वक्ते**
*Jyotsna Wankhede*: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रपूर नगराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रामनगर येथील चांदा पब्लिक स्कूल येथे सायंकाळी ६.१५ वाजता होणार असून, या विजयादशमी उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. अरुण नारायण तिखे उपस्थित राहणार आहेत. ते माळी महासंघ या सामाजिक संघटनेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष व अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश म्हणून कार्यरत आहेत. तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. मंगेशजी भेंडे उपस्थित राहणार असून, ते अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख, रा. स्व. संघ आहेत.
विजयादशमी हा हिंदू परंपरेतील महत्त्वाचा सण असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेत या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. सामूहिक शक्ती जागरण, संघटन, शिस्त आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश या उत्सवाच्या माध्यमातून दिला जातो. याच उद्देशाने चंद्रपूर नगरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी नगर संघचालक रविंद्र भागवत यांनी नागरिकांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांनी वेळेपूर्वी किमान १० मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी पोहोचावे, अशी विनंतीही आयोजकांकडून करण्यात आली आहे.
*पथसंचलन*
श्री विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता पथसंचलन आयोजित करण्यात आले आहे. हे पथसंचलन चांदा पब्लिक शाळेतून निघणार असून जगन्नाथ बाबा वार्डात मार्गक्रमण करेल.