लोकमान्य विद्यालयाच्या अमृत महोत्सवातून ज्ञान, मूल्ये अन् कर्तृत्वाचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवा – आ. सुधीर मुनगंटीवार
सिने-अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘लोकामृत’ स्मरणिकेचे प्रकाशन
शिक्षणासोबत संस्कार, राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाची रुजवणूक करणाऱ्या लोकसेवा मंडळाच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव
*Jyotsna Wankhede* : एखाद्या शैक्षणिक संस्थेचा अमृत महोत्सव म्हणजे केवळ ७५ वर्षांच्या वाटचालीचा गौरव नव्हे, तर त्या प्रवासातून मिळालेल्या ज्ञानाचा, संस्कारांचा आणि कर्तृत्वाचा समृद्ध वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन घडविताना त्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठेची भावना रुजविणे आवश्यक आहे. लोकसेवा मंडळ, भद्रावती संचलित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाने गेल्या ७५ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देत समाजघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. या गौरवशाली परंपरेचे जतन करून त्यामधील मूल्ये आणि विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प अमृत महोत्सवाच्या निमित्ताने करावा, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात मराठी सिने-अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘लोकामृत’ स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याला वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, नगरपरिषदेचे अध्यक्ष प्रफुल चटकी, लोकसेवा मंडळाचे सचिव उल्हास भास्करवार, सहसचिव अमित गुंडावार, कार्यकारी अधिकारी सचिन सरपटवार, नामदेवराव कोल्हे, गोपाल ठेंगणे, संजय पारधे, अविनाश पापंट्टीवार, उमाकांत गुंडावार, प्राचार्य रूपचंद धारणे, आशिष गुंडावार, प्रकाश धारणे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सिने-अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे भद्रावतीच्या पावन भूमीत स्वागत केले. लोकसेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारून उपस्थित राहिल्याबद्दल आ.मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले. संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा होईल, तेव्हाही याच ऊर्जेने आणि उत्साहाने उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर ‘लोकामृत’ स्मरणिकेचे अधिकृत प्रकाशन झाल्याचे घोषित करण्यात आले.
भद्रावतीच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान
तेजोदायिनी माता महाकाली आणि राणी हिराई यांच्या परंपरेने समृद्ध झालेली चंद्रपूरची भूमी आहे. भारत-चीन युद्धाच्या काळात देशासाठी सोने दान करणाऱ्या दानशूर नागरिकांचा वारसा या भूमीला लाभला आहे. वाघांची भूमी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भद्रावतीचेही महत्त्वाचे स्थान आहे. जैन, बौद्ध आणि हिंदू धर्मांच्या ऐतिहासिक परंपरांनी या नगरीला समृद्ध केले आहे. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या भूमीत शिक्षणाची ज्योत सातत्याने प्रज्वलित ठेवणाऱ्या संस्थेचा अमृत महोत्सव साजरा होणे ही अभिमानाची बाब असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
शिक्षणासोबत संस्कारांची जोड महत्त्वाची
एखाद्या संस्थेचे खरे महत्त्व तिच्या वर्षांच्या संख्येत नव्हे, तर समाजासाठी केलेल्या कार्यात आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात घडविलेल्या परिवर्तनात असते. शिक्षणासोबत संस्कारांची जोड देऊन संवेदनशील माणूस आणि जबाबदार नागरिक घडविणे, हे लोकसेवा मंडळाचे वैशिष्ट्य आहे. स्वर्गीय निळकंठराव गुंडावार यांच्यापासून सुरू झालेली ही शैक्षणिक परंपरा आज तिसऱ्या पिढीकडून पुढे नेली जात आहे. वंचित आणि बहुजन घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देतानाच त्यांच्यात मातृभूमीप्रेम, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्याचे मोलाचे कार्य संस्थेने केले आहे.
मातृभूमीप्रेम आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार रुजवा
‘नमो मातृभूमी, जिथे जन्मलो मी; नमो आर्यभूमी, जिथे वाढलो मी; नमो पुण्यभूमी, जिथे सात्त्विक भावाने जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली,’ या भावनेतून विद्यार्थ्यांच्या मनात मातृभूमीविषयी आदर आणि राष्ट्रप्रेम जागविणे ही काळाची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळविण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठा, नेतृत्वगुण आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसोबतच राष्ट्राच्या उभारणीत आपली जबाबदारी ओळखणारी पिढी घडविणे हे शिक्षणाचे व्यापक उद्दिष्ट असले पाहिजे, असे मत आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचा संस्थेविषयीचा अभिमान हीच खरी कमाई
देशात किंवा परदेशात उच्च पदावर पोहोचलेल्या विद्यार्थ्याने ‘मी लोकमान्य विद्यालयाचा विद्यार्थी आहे,’ असे अभिमानाने सांगणे, हाच संस्थेसाठी सर्वांत आनंदाचा क्षण असेल, अशी भावना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. शिक्षणातून विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करून त्यांना सक्षम, स्वाभिमानी आणि जबाबदार नागरिक घडविणे आवश्यक आहे. लोकसेवा मंडळाच्या अमृत महोत्सवातून ज्ञान, मूल्ये आणि कर्तृत्वाचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.