*पार्किंग करून ठेवलेल्या कारचे चाके चोरणा-यास रामनगर पोलीसांनी ताब्यात घेऊन दोन गुन्ह्यातील १,७०,५००/- रुपये किंमतीचा माल जप्त*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. २१/१०/२०२६ रोजी रात्री २०.०० ते दि. २२/१०/२०२६ रोजी ०९.३० वा.च्या दरम्यान तक्रारदार भूषण नारायणराव गवांडे, रा. कुंदन प्लाझा चौक, चंद्रपूर यांनी त्यांच्या मालकीची मारुती सुझुकीची ब्रीझा कार त्यांचे नागपूर रोड वरील गॅरेज समोर पार्किंग करून ठेवलेली असताना कोणातरी अज्ञात इसमाने तिचे चारही टायर अलॉयव्हीलसह काढून नेले होते. त्याबाबत त्यांनी दिलेल्या रिपोर्टावरून पो.स्टे. रामनगर येथे अपराध क्र. १२३१/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच कुंदन प्लाझा चौकात ए.वन कार वॉशिंग सेंटर समोर लावलेली लक्की मुबारक हुसेन अन्सारी यांचेकडे गॅरेजवर आलेल्या बलेनो कारचे देखील चार टायर अलॉयव्हीलसह काढून नेले होते. त्याबाबत देखील पो.स्टे.रामनगर येथे अपराध क्र. १२३२/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल होता.
सदर आरोपींचा शोध घेऊन आरोपीस अटक करून, गेला माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना मा. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी पो.स्टे. रामनगर शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार चोरी करणा-या व्यक्तीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा हवेली गार्डन येथील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्यास कार घेण्यासाठी कमी पडलेले पैसे गोळा करण्यासाठी चोरी करून सदर वाहनांचे टायर विकण्यासाठी केल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यास त्याचे पालकांसमक्ष ताब्यात घेऊन त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्याचेकडून एकूण आठ टायर अलॉयव्हीलसह तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी व एक चारचाकी वाहनाचा जॅक असे एकूण १,७०,५००/- रू. कि.चे साहित्य जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे,रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्लूटी साखरे यांनी केली आहे.