Monday, October 26, 2026
spot_img
HomeChandrapurपात्र नजूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – आ. किशोर जोरगेवार...

पात्र नजूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – आ. किशोर जोरगेवार पट्टे वाटप प्रकियेबाबत महानगर कार्यालयात मार्गदर्शक बैठक

पात्र नजूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – आ. किशोर जोरगेवार

पट्टे वाटप प्रकियेबाबत महानगर कार्यालयात मार्गदर्शक बैठक

*Jyotsna Wankhede*: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीतून आणि विकासाभिमुख निर्णयांमुळे नजूलधारकांना जागेचे कायमस्वरूपी पट्टे मिळण्याचा मार्ग सुकर होत आहे. चंद्रपूर शहरातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याच्या जागेचा कायमस्वरूपी पट्टा मिळावा, यासाठी आपण प्रयत्नशील असून, या प्रक्रियेत येणार्या अडचणी आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

  चंद्रपूर शहरातील अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे मिळवून देण्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर कार्यालयात आयोजित मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते.

   यावेळी झोपडपट्टी असोशिएशनचे अध्यक्ष सुधाकर कातकर, भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जेष्ठ नेते प्रकाश देवतळे, महामंत्री नामदेव डाहुले, गटनेता शेखर शेट्टी, नगरसेविका सविता कांबळे, एस.आय.आर. प्रमुख सुमित बेले, राकेश बोमनवार, हेमलता खोब्रागडे, रीना साखरकर, मनीषा पडगेलवार, प्रिन्स प्रसाद यांच्यासह नजुल धारकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि संबंधितांनी या विषयावर आपापली मते मांडली. नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, संभाव्य उपाययोजना आणि पुढील कार्यवाही याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहरातील नागरिक कायमस्वरूपी पट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहेत. या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या जागेचा अधिकृत पट्टा मिळाल्यास त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि भविष्यातील अनेक अडचणी दूर होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या विकासाभिमुख निर्णयांमुळे या प्रश्नाच्या निराकरणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला या प्रक्रियेचा लाभ मिळावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत.

  चंद्रपूर शहरातील ३९ झोपडपट्टी भागांमध्ये सध्या नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात आणि पट्टे वाटपाच्या प्रक्रियेसाठी सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणादरम्यान समोर येणार्या त्रुटी आणि अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पात्र लाभार्थी प्रक्रियेपासून वंचित राहू नयेत, तसेच आवश्यक कागदपत्रे आणि इतर बाबींमुळे निर्माण होणार्या अडचणींचे निराकरण व्हावे, यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याची गरज असल्याचेही आमदारांनी स्पष्ट केले.

  या प्रक्रियेत नागरिकांनीही सहकार्य करावे. सर्वेक्षणादरम्यान काही अडचणी येत असतील किंवा पात्र असूनही एखाद्या लाभार्थ्याला अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल, तर संबंधित माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असे  आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page