*रंगगंध कलासक्त न्यास व संस्कार भारती चंद्रपूर आयोजित साहित्य अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरी चंद्रपूरात ७ जानेवारी रोजी*
Shreyash Wankhede:
चाळीसगावच्या ‘रंगगंध कलासक्त न्यास’ या नामांकित संस्थेच्या पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर साहित्य अभिवाचन स्पर्धेची चंद्रपूर जिल्हास्तरीय प्राथमिक फेरी चंद्रपूर केंद्रावर दि ७ जानेवारी २०२४ रोजी संस्कार भारती चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेची अंतीम फेरी २३ ते २५ फेब्रुवारी २०२४ रोजी चाळीसगाव येथे होणार आहे. लोकमान्य टिळक विद्यालय स्टेडियम बिल्डिंग चंद्रपूर येथे सकाळी 11 वाजता प्राथमिक फेरीला सुरुवात होईल.
चंद्रपूर केंद्रावर रविवार ७ जानेवारी रोजी प्राथमिक फेरी घेण्यात येणार असून त्यातून अंतिम फेरीसाठी एका संघांची निवड करण्यात येईल.
या वेळची स्पर्धा थोडी वेगळी असणार आहे. या वर्षी चरित्रकथन आणि रहस्य कथा / गूढकथा या दोनच साहित्य प्रकारातलं अभिवाचन स्पर्धेसाठी स्वीकारण्यात येणार आहे.
पण ही अट या स्पर्धेसाठी नव्यानं लिहीलेल्या संहितेसाठी लागू नाही. अर्थात नाटक किंवा एकांकिका चालणार नाही. यावेळी प्राथमिक फेरीसाठी नव्या संहितेला पाच गुण अधिक देण्यात येतील.
सादरीकरणाचा कालावधी २५ ते ३० मिनिटे असावा. स्पर्धक कलाकारांची संख्या किमान दोन व कमाल पाच असावी. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च महत्व वाचिक अभिनयाला दिले जाणार असून सादरीकरणामध्ये पार्श्वसंगीताचा वापर करता येईल. मात्र त्यासाठी वेगळे गुण असणार नाहीत. या स्पर्धेमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेषभूषा आदी घटकांना स्थान राहणार नाही.
प्राथमिक फेरीमध्ये तीन वैयक्तिक वाचिक अभिनयाची प्रमाणपत्रे देण्यात येणार असून या फेरीतील प्रथम एका संघांला अंतीम फेरीमध्ये प्रवेश मिळेल. प्राथमिक फेरीसाठी प्रवास, भोजन आदी सर्व व्यवस्था स्पर्धक संघांनी स्वत: करावयाची आहे. प्राथमिक फेरीतील प्रत्येक संघाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. अंतीम फेरीतील कलाकारांना अंतीम फेरीतील सादरीकरणानंतर प्रत्येकी रु. ५००/- (कमाल कलावंत सात) प्रवास खर्च सहाय्य देण्यात येईल. तसेच या स्पर्धकांची डॉर्मेटरी स्वरुपातील निवासाची व भोजनाची सोय आयोजकांतर्फे करण्यात येईल.
इच्छुक स्पर्धक संघांनी रु. ५००/- प्रवेश शुल्कासह संपूर्ण भरलेले प्रवेश अर्ज ५ फेब्रुवारीपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. अधिक माहिती व तपशीलाकरीता इच्छुकांनी सौ संध्या विरमलवार 9422138451आणि सौ जागृती फाटक
90218 45519यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्कार भारती चंद्रपूर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.






