असभ्य वर्तणूक अंगलट : समस्या निवारण सभा
श्रेयश वानखेडे:
संघटनेच्या पदाधिकारी व शिक्षकांशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना आमदार सुधाकर अडबाले यांनी भर बैठकीत चांगलेच खडसावले. प्रलंबित समस्यांबाबत विचारणा करण्यासाठी येणाऱ्या पदाधिकारी व शिक्षकांचा अपमान खपवून घेणार नाही, असा आमदार सुधाकर अडबाले यांनी दम देताच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिलगिरी व्यक्त केली.
नागपूर विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांच्या संकल्पनेतून मागील वर्षांपासून सुरू केलेल्या ‘समस्या तुमच्या पुढाकार आमचा’ या ‘वि.मा.शि. संघा’च्या उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांच्या समस्या निवारणासाठी समस्या निवारण सभा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा येथील सभागृहात शुक्रवारी पार पडली.
वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी मान्यता प्रदान करणे, अनुकंपा प्रकरणे, जीपीएफ पावत्या सद्यस्थिती, मुख्याध्यापक / उपमुख्याध्यापक / पर्यवेक्षक व वैयक्तिक पदाची मान्यता व इतर अनेक वैयक्तिक प्रकरणे मोठ्या प्रमाणात शिक्षण विभागात प्रलंबित असल्याने सर्व वैयक्तिक प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
सोबतच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या सामूहिक व वैयक्तिक प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक प्रकरणे तात्काळ निकाली काढा, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) यांना निर्देश दिले.
यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीतू गावंडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू इटनकर, जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, रवी शेंडे, पे युनिट अधीक्षक ज्ञानेश्वर जवादे, कार्याध्यक्ष पांडुरंग भालशंकर, शशिकांत वैद्य, शशांक हुलके, संदीप चवरे, प्रमोद खोडे, सुरेशकुमार बरे, रवींद्र वाघमारे, धर्मपाल मानकर, नंदकिशोर ठाकरे, संजय घोडमारे, सुनील धवणे, सुनील दुंपलवार, प्रवीण देशमुख, मंदा चौधरी, सुहास गवते व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विमाशी संघाचे सदस्य उपस्थित होते.