Abstract :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वास्तववादी विचार करणारे तत्वज्ञ होते. त्यांचे विचार हे वास्तवावर आधारित होते. त्यांच्या नजरेतून असा एकही विषय सुटला नाही, ज्यावर त्यांनी आपले विचार मांडले नसतील. एकाच आयुष्यात माणसाने किती विविधांगी वाचन करावे याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण अद्वितीय आहे. उच्चशिक्षणासाठी परदेशी गेल्यावर तिथे मिळेल तो सर्व वेळ बाबासाहेबांनी ग्रंथालयात बसून ज्ञानग्रहण करण्यासाठीच सत्कारणी लावला. बाबासाहेबांना वाचनातून तिसरा डोळाच लाभला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण संघर्षमय जीवन पटलाकडे जर नजर टाकली तर आपल्या सहज लक्षात येईल की, असे हे त्यांचे जीवन शिकण्यात, शिकविण्यात आणि शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात समर्पित झालेले आणि एकवटलेले आपल्याला दिसून येईल. आपल्या आयुष्यात सातत्याने वाचणारा हा महान पुरुष आधुनिक भारताच्या इतिहासात आम्हा सर्वांना एक स्फूर्तीस्थान ठरवा असा आहे.
प्रस्तावनाः-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील उपेक्षितांसाठी केलेले कार्य हे अजोड स्वरूपाचे आहे. ते प्रकांड पंडित होते. त्यांचे विविध विषयांवर प्रभुत्व होते. यासाठी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेतले. बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा प्रवास सातारा, मुंबई, अमेरिका, इंग्लंड अशाप्रकारे पूर्ण केला. एम. ए., पीएच्.डी., डी.एस.सी., एल.एल.डी., डी.लिट; बार-अॅट-लॉं. या पदव्या त्यांनी ज्ञानाच्या बळावर मिळविल्या त्यामुळे समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कृषि, कामगार, धर्म, संस्कृती या विषयांवरील त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांच्या विविधांगी प्रचंड कार्यामुळे देशातील व जगातील लोक त्यांना इतिहासकार, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, समाजसुधारक, पत्रकार, बोधिसत्व,
घटनाकार, ग्रंथप्रेमी, ग्रंथकार, ज्ञानयोगी, राष्ट्रवादी, राष्ट्रनिर्माते, युगपुरुष अशा विविधांगी भूमिकांमधून पाहतात. त्यांचे हे विविध क्षेत्रातील योगदान आजही भारतीयांना व परदेशी लोकांना प्रेरणा देणारे आहे. परदेशातील शिक्षणासाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्याला तोड नाही.
दररोज अठरा-अठरा तास याप्रमाणे सतत अभ्यास केला. शिक्षणामुळे प्रगतीच्या आणि विकासाच्या विविध संधी प्राप्त होतात. हे त्यांनी जाणवले त्यासाठी अनेक दुर्मिळ ग्रंथाचे वाचन केले. संशोधन केले, संशोधन करून विचारप्रवर्तक अशी ग्रंथसंपदा लिहिली की, ज्या ग्रंथातून समाजाची, देशाची उन्नती साधता येईल. प्रस्तुत शोधनिबंधात डॉ. बाबासाहेब
आंबेडकर कसे ग्रंथप्रेमी व ग्रंथकर होते याचा अल्पसा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रंथप्रेमी आणि ग्रंथकार :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणसाठी त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांनी अतोनात कष्ट घेतले. बाबासाहेब अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे विद्यार्थी दशेत त्यांचा पदोपदी अपमान होऊ लागला. पण त्यातही केळुस्कर गुरुजींच्या प्रोत्साहामुळे व मार्गदर्शनामुळे बाबासाहेब आंबेडकर उत्तम तऱ्हेने मॅट्रिकची परीक्षा १९०७ साली
पास झाले. केळूस्कर गुरुजींनी त्यांना स्वलिखित बुद्धचरित्र पुस्तक बक्षिस दिले. बक्षिस म्हणून मिळालेल्या बुद्धचरित्र्याचे चांगले मन लावून वाचन केले. मुंबईला दिनांक १४/०१/१९५५ च्या सभेत बाबासाहेब बोलतांना म्हणतात, “रामायण-महाभारतासारखे बरेच ग्रंथ मी वाचून काढले होते. तसेच हेही पुस्तक वाचले परंतु बुद्धांची शिकवण व इतर ग्रंथांची शिकवण यात बरीच तफावत आहे असे मला आढळून आले. पुढे या पुस्तकासारखी नवीन पुस्तके जसजशी मी वाचून मागे तस तसा माझ्या डोक्यात नवा प्रकाश पडू लागला.” पुढे केळुस्कर गुरुजींच्या मदतीने सयाजी महाराज गायकवाड यांच्याकडून दरमहा २५ रु. ची शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि पुढील शिक्षणाकरिता मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला ते इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे १९१२ साली झालेल्या बी. ए. च्या परीक्षेत ते यशस्वी झाले. आणि मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी मिळवली. पुढे काही दिवस बडोदा संस्थानाबरोबर झालेल्या शिष्यवृत्ती करारानुसार ७५ रुपये मासिक पगारावर अकाऊंटन्ट जनरल ऑफिसमध्ये (मुलकी सेवेत) नौकरी करण्याची संधी मिळाली. काही दिवस नौकरी करीत नाही तर वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर ते बडोदे महाराजांना भेटून बडोद्यातील नौकरी व राहण्याची किती गैरसोय आहे याबद्दलची हकीकत महाराजांना निवेदन केली. बाबासाहेबांचे इंगजी भाषेवरील प्रभुत्व व त्यांचे नयनमनोहर इंग्रजी हस्ताक्षर पाहून महाराज त्यांच्यावर खुश झालेले होते. पुढे बडोदे महाराजांनी संस्थानाची शिष्यवृत्ती दरमहा साडेअकरा पौंडाची मंजूर करून न्युयॉर्कच्या कोलंबिया विद्यापिठामध्ये शिकण्यासाठी तीन वर्षा करिता मंजूर केली.
करारपत्रावर रीतसर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानुसार परदेशातील उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर सदर विध्यार्थ्याने शिष्यवृत्तीची सर्व रक्कम संपूर्णपणे फिटेपर्यंत संस्थानाची नौकरी करणे बंधनकारक होते. भारतीय मनुष्याला परदेशात अध्ययनासाठी जावयास मिळणे ही त्याकाळी एक मोठी दुर्लभ संधी गणली जाई. स्वाभाविकपणे अस्पृश्य तरुणाला तर ती एक पर्वणीच वाटावी.
आयुष्यात मिळालेल्या या संधीचा भरपूर लाभ घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक क्षण हा सोन्याचा क्षण मानून, अभ्यासासाठीच व्यतीत केला. शिष्यवृत्तीच्या पैशाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला. बाबासाहेबांचे ध्येय अमेरिकेतील मोठ्यातली मोठी विश्वविद्यालयीन पदवी मिळविणे हेच केवळ नव्हते, तर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नितीशास्त्र आणि मानववंशशास्त्र इत्यादी विषयात पारंगत होण्याची प्रबळ महत्वाकांक्षा त्यांनीबाळगली होती. बाबासाहेबांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या राज्यशास्त्र विभागात जुलै १९१३ ते जुन १९१६ या तीन वर्षासाठी प्रवेश मिळाला. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील आपाल्या एम.ए. व पीएच्.डी. या परीक्षांसाठी त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र आणि राजकारण हे दुय्यम विषय त्यांनी घेतले. कोलंबिया
युनिव्हर्सिटीत येण्यापूर्वी अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक व राजकीय नीतिशास्त्र इत्यादी आपल्या परीक्षांसाठी निवडलेल्या विषयांची त्यांना फारशी माहिती नव्हती. कारण बाबासाहेबांनी बी.ए. ला भाषाविषय (इंग्रजी व पर्शियन) घेतलेले होते. पुढे त्यांना कळून आले की, शास्त्रीय विषयाचे ज्ञान असल्याशिवाय मनुष्याला खरी विद्वत्ता लाभत नसते. या विषयाचा अभ्यास करून बी.ए. झालो असतो तर फार बरे झाले असते असे त्यांना वाटू लागले; म्हणून त्यांनी बी.ए. झाल्यानंतर या विषयांचे अनेक पुस्तके वाचण्याचा सपाटा चालविला. या वाचनाने अर्थशास्त्र व समाजशास्त्र हे विषय अत्यंत महत्वाचे होत अशी त्यांची खात्री झाली. म्हणून त्यांनी कोलंबिया विद्यापीठातील पदवीसाठी हे विषय निवडलेले दिसतात. परदेशात विद्याभ्यासासाठी जाणारे विद्यार्थी आपण विद्यार्जनात नावलौकिक कमवू अशा इच्छेने जातात, पण परदेशातील मायावी वातावरणात गेल्यानंतर ते आपली प्रतिज्ञा विसरतात व जेमतेम अभ्यास करून पदव्या घेऊन मायदेशी परततात, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तसे नव्हते. नुसत्या पदव्या मिळवून उपयोगाचे नाही, जर मी सर्व विषयांचा अमुलाग्र अभ्यास केला तरच मी जगातील विद्वान पंडितांच्या रांगेत बसू शकेन, नुसत्या पदव्या मिळविण्याकरिता अभ्यास केला तर सामान्य दर्जाचे आयुष्य घालावीत बसेन! अशा तऱ्हेचे विचारतरंग त्यांच्या मनात चालू होते. कारण अमेरिकेतील सुरुवातीचे चार-पाच महिने आपण व्यर्थ दवडले याबद्दल त्यांना खेद होत होता. नंतर अभ्यास करण्याचा जो सपाटा लावला की पुढे हा निश्चयाचा मेरूमणी यत्किंचितही ढळला नाही. अमेरिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानयज्ञास अशाप्रकारे प्रारंभ झाला की, दररोज अठरा-अठरा तास याप्रमाणे अभ्यास चालत होता. कधी कधी रात्रच्या रात्र पुस्तके वाचण्यात जात होती. वाचन कार्य सुरु असतांना त्यांना सपाटून भूक लागे. तेव्हा एक कप कॉफी व दोन केक, यावर भडकलेली भूक शांत करावी लागे. शिष्यवृत्तीच्या पैशातून पत्नीला घरखर्चासाठी काही पाठवावे लागायचे. अमेरिकेत असतांना अभ्यास व अभ्यासाबरोबर इतरही विषयाचे दुर्मिळ पुस्तके वाचण्याचा
त्यांना अतिशय छंद लागला होता. पुस्तके घेण्याकरिता पैसे नसायचे त्यासाठी शहरातील जुन्या पुस्तक विक्रीच्या दुकानात वेळ मिळेल तेव्हा अर्ध्या किमतीत पुस्तक विकत घ्यायचे. ग्रंथ विकत घेण्याची बाबासाहेबांची भूक न शमता ती वाढतच होती. उपाशी राहून पोटाला
चिमटा देऊन, पोट बांधून ग्रंथ विकत घेण्याच्या वेडामुळे त्यांचे जवळ सुमारे दोन हजार जुन्या ग्रंथाचा संग्रह झाला होता. पुढे ते ज्ञानभांडार भारतात नेण्यासाठी त्यांनी आपल्या एकामित्राच्या स्वाधीन केले. भारतात येईपर्यंत त्यातील काही महत्वपूर्ण ग्रंथ गहाळ करण्यात आले. उरलेले त्यांच्या हाती आले. त्यावेळी त्यांना अतिशय दुखः झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जुने पुस्तके जमा करून त्यातील महत्वाच्या नोंदी घेऊन, कोलंबिया विद्यापीठातील ग्रंथालयात सकाळ संध्याकाळ ज्ञान समाधी लावून, हजारो पुस्तके वाचून, त्यातील नोंदी काढून अथक परिश्रमाने पुढे १९१५ साली ‘अॅडमिनिस्ट्रेशन अॅड फायनान्सेस ऑफ ईस्ट इंडिया कंपनी’ ह्या विषयावर प्रबंध लिहून एम. ए. पदवी संपादन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा पहिला ग्रंथ होय. या शोधनिबंधात त्यांनी इ. स. १७९२ ते १८५८ या कालखंडातील ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासन आणि वित्तप्रणाली यासंबंधीच्या धोरणातील बदलांचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. पुढे १९१६ सालच्या मे महिन्यात वयाच्या २६ व्या वर्षी डॉ. बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातील समाजशास्त्राचे
प्रा. डॉ. गोल्डनवेझर यांच्या मानववंशशास्त्र विभागाच्या सेमिनार मध्ये ‘भारतातील जातीसंख्या तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास (castes in India : Their Mechanism, Genesis and Development) या विषयावर आपला संशोधनात्मक निबंध वाचला’. पुढे १९१६ जुन मध्ये ‘भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन’ (The National Dividend of India a Historical and Analytical Study) अथक परिश्रमानंतर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. शैक्षणिक क्ष्रेत्रातील हे त्यांचे यश एवढे घवघवीत होते की, कोलंबिया विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेजवानी देऊन हार्दिक अभिनंदन केले. पुढे आठ वर्षांनी हा त्यांचा विस्तृत प्रबंध पी. एस. किंग अँड सन्स ह्या प्रकाशन संस्थेने ‘ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती’ (The Evolution of Provincial Finance in British India) या नावाने प्रसिध्द केला. या प्रबंधासाठी कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) ही पदवी बहाल केली.
कोलंबिया विद्यापीठाच्या दोन पदव्या मिळविल्यानंतर अर्थशास्त्रातील इतर प्रश्नांवर प्रबंध लिहून लंडन विद्यापीठाच्या सर्व पदव्या काबीज कराव्यात अशी डॉ. बाबासाहेबांना महत्वाकांक्षा उत्पन्न झाली. त्यासाठी बडोदे महाराजांकडे आणखी दोन वर्ष स्कॉलरशिप वाढवून देण्यात यावी हे लिहून कळविले. महाराजांनी प्रथम एक वर्ष स्कॉलरशिप मंजूर केली. डॉ.
बाबासाहेब न्यूयॉर्कहून लंडनला लीव्हरपूर बंदरात जून १९१६ ला पोहचले तेथून इंडिया हाऊस पुढे प्रोफेसर कॅनन, मी. सिडने वेब, सर लॉंयनेल अब्राहम असा भेटीचा प्रवास. सर लॉंयनेल अब्राहम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर खूप खुश झाले व त्यांनी डॉ. बाबासाहेबांना इंडिया हाऊसमधील सरकारी कागदपत्रे वाचण्याची व त्यातील माहितीचा आपल्या भावी ग्रंथांकारिता उपयोग करण्याची परवानगी दिली. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅन्ड पोलिटीकल सायन्स या संस्थेत ऑक्टोबर १९१६ मध्ये प्रवेश मिळविला. डॉ. बाबासाहेबांनी अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचा बराच अभ्यास केला असल्यामुळे लंडन विद्यापीठाने बी.एस्सी च्या परीक्षेला न बसता सरळ एम. एस्सी. च्या परीक्षेस बसण्याची परवानगी दिली.
एम. एस्सी. च्या पदवीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी Provincial Decentralisation of India Finance या नावाचा प्रबंध लिहिण्याचे ठरविले. त्या विषयावरची सर्वतोपरी माहिती मिळविण्यासाठी लंडन स्कूल, ब्रिटीश म्युझियम व इंडिया हाऊस या संस्थानातील तीन प्रचंड ग्रंथालयामध्ये पुस्तके वाचण्याचा व टिपणे लिहून काढण्याचा बाबासाहेबांनी लंडन स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्यापासून सपाटा चालविला. सोबतच बॅरिस्टरिचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी
बाबासाहेबांनी नोव्हेंबर १९१६ ला ग्रेज इनमध्ये नाव दाखल केले. नोव्हेंबर पासून ग्रेज इनमधील बारची लेक्चर्स ऐकावयास ते जात. सकाळी ८ वा. सुरुवात केलेले वाचन व अभ्यास रात्री एक ते दोन वाजेपर्यंत चालत असे. मध्यंतरीचा दोन तासांचा वेळ फक्त जेवण्यात व विश्रांती घेण्यात जाई. ज्ञानसाधनेसाठी एवढी उग्र तपश्चर्या डॉ. बाबासाहेबांची सतत चालली
होती. पुढे बडोदे संस्थानकडून मिळत असलेल्या शिष्यवृत्तीची वाढीव मुदत संपत आली.
बाबासाहेबांनी शिष्यवृत्तीची आणखी दोन वर्षे मुदत वाढविण्यासाठी बडोदा संस्थानिकाला विनंती केली, परंतु संस्थानाचे दिवान सर मनुभाई मेहता यांनी ती मंजूर होऊ दिली नाही. आणखी पाच-सहा महिन्यांच्या अवधीत त्यांचा Provincial Decentralisation of Indian Finance हा प्रबंध लिहून होणार होता. दोन वर्षे शिष्यवृत्ती पुढे चालू राहिली असती तर एम. एस्सी., डी.एस्सी. व बार-अॅट-लॉ या पदव्या प्राप्त झाल्या असत्या. एम.एस्सी. साठी प्रबंध आणखी काही काळाने
विद्यापीठाला सादर करण्याची सवलत मिळवून घेतली. चार वर्षाच्या आत खंड पडलेला अभ्यासक्रम पुन्हा सुरु करून संपवावा. असे विद्यापीठाने बाबासाहेबांना कळविले. बाबासाहेबांना एम.एस्सी. च्या प्रबंधात जसा शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने अडथळा आला तसा बॅरिस्टरच्या कोर्सलाही आला. म्हणून बाबासाहेबांनी ग्रेज इन कडूनही काही काळानंतर पुढील अभ्यास करण्याची परवानगी मिळविली.
शिष्यवृत्तीची मुदत न वाढल्यामुळे बाबासाहेब मुंबईला परतले, कोलंबिया विद्यापीठाचा ज्याप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण केला तसा लंडन विद्यापीठाचा अभ्यास पूर्ण न करताच परतावे लागले. याबद्दल बाबासाहेबांना मनस्वी दुखः झालेले होते. लंडनहून निघताना दोन-तीनशे पुस्तके व इतर समान ‘सालसेट’ नावाच्या आगबोटीतून थॉमस कुक अँन्ड सन्स या कंपनीने पाठविले. परंतु ही वेळ पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीची असल्यामुळे ती आगबोट मुंबईला
पोहोचण्यापूर्वी शत्रूंनी समुद्रात बुडविली. ग्रंथ बुडाल्याचे त्यांना फार मोठे दुखः झाले. पुढे कराराप्रमाणे बडोदे संस्थानात नोकरी स्वीकारली तेथेही बाबासाहेब फावल्या वेळात बडोद्याच्या सेन्ट्रल लायब्ररीत जाऊन वाचन करीत. एके दिवशी बाबासाहेब कचेरीतील काम संपवून दोन वाजता लायब्ररीकडे चालले तेव्हा एक अधिकारी म्हणाला, ‘चालले हे साहेब लायब्ररीचे नाव सांगून भटकायला ! तेव्हा बाबासाहेब थांबून त्याला म्हणाले, ‘हे पहा तुम्ही माझ्याबरोबर चला
लायब्ररीत म्हणजे मी त्या लायब्ररीत किती पुस्तके वाचलीत व त्यावर किती टिपणे काढलीत ती दाखवतो तुहाला ! यावर तो अधिकारी काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्या टिपणांच्या जाड-जाड बारा वह्या सदर अधिकाऱ्याला दाखवल्या व त्याला म्हटले, तुम्ही बडोद्यात बारा वर्षे राहता. सांगा पाहू तुम्ही किती पुस्तके वाचलीत ? यावर तो अधिकारी खजील झाला. तेव्हापासून तो बाबासाहेबांच्या वाटेला गेला नाही. बडोदे सरकारची
स्कॉलरशिप मिळाल्यावर ते कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून स्कॉलरशिपच्या अटीप्रमाणे संस्थानात नोकरी करू लागले. परंतु बडोद्यास त्यांना राहावयास घर मिळेना, हिंदू किंवा मुसलमान कोणीच जागा देईना शेवटी पारशी नाव धारण करून पारशी धर्मशाळेत राहू लागले. कालांतराने लोकांना शंका आली. लोक त्यांच्या अंगावर धाऊन आले.
कार्यालयातही पदोपदी मानहानी होत होती. यावेळी अस्पृश्यतेच्या भडाग्नीने त्यांचे अंतकरण होरपळून गेले. शेवटी नाईलाजास्तव नोकरी सोडून मुंबईला परत आले. नंतर त्यांना सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दरमहा साडेचारशे रुपये पगाराची प्रोफेसरची नौकरी मिळाली. ती त्यांनी वर्ष सवावर्ष अल्पकाळ नौकरी करून राजीनामा दिल. थोडीफार जमापुंजी केली. त्यातील काही रक्कम त्यांनी आपल्या कुटुंबाच्या स्वाधीन करून त्यांचा डी. एससी व बॅरिस्टरीचा अपूर्ण
राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा लंडनला जाण्यात यशस्वी झाले. या शिक्षणाकरिता कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडून आर्थिक सहाय्य घेऊन, तसेच त्यांचे जुने मित्र नवल भातेना यांच्याकडून ५००० रुपयाचे वैयक्तिक कर्ज काढून आणि त्यात आपली ७००० रुपयांची पुंजी मिळवून ५ जुलै १९२० ला पुढील शिक्षणाचा प्रवास सुरु झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनला परतल्यावर सप्टेंबर १९२० मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पोलिटीकल सायन्स’ आणि ग्रेज इन या दोन्ही संस्थांमध्ये आपले शिक्षणपूर्ववत चालू केले. अवघ्या अडीच वर्षात त्यांनी एम.एससी व त्याच्या पुढली म्हणजे शेवटली डी.एससी. या दोन परीक्षांसाठी निबंध लिहून पुरे केले. ‘प्रॉव्हिन्शियल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पिरिअल फायनान्स इन इंडिया’ या प्रबंधासाठी त्यांना मास्टर ऑफ सायन्स (एम.एससी) ही पदवी बहाल करण्यात आली, तर डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी) पदवी साठी ‘द प्रोब्लेम ऑफ रुपी’ नावाचा प्रबंध लिहिला. त्यांनी याच अडीच वर्षाच्या अवधीत याच अभ्यासासोबत कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टरची परीक्षा दिली. त्यांना २८ जून १९२२ रोजी बॅरिस्टर पदवीने सन्मानित करण्यात आले. इंग्लंडमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी चोवीस तासापैकी
एकवीस तास बसून आठ वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या अडीच वर्षात पूर्ण केला. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिक्षणात खंड पडू न देता आजन्म विद्यार्थी राहिले. त्यादरम्यान त्यांनी अनेक ग्रंथाचा संग्रह केला व अनेक ग्रंथांची निर्मिती केली. स्वतःच्या ग्रंथांसाठी भव्य स्मारक बांधणारा ज्ञानवेडा जगात सापडणार नाही. ग्रंथावर डॉ. बाबासाहेबांचेविलक्षण प्रेम होते. राजगृहातील ग्रंथ संपदेचा डॉ. बाबासाहेबांना अभिमान वाटे. बाबासाहेबांच्या
ज्ञान निष्ठेला कोणी आव्हान करू शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांना उत्तर देणारा उभ्या विश्वात कोणी झाला नाही. पुस्तके ठेवण्याकरिता विशाल घर बांधणारा व स्वतःचे एवढे समृध्द भव्य व दिव्य ग्रंथालय असणारे ते आशिया खंडात एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या वाचनालयात असलेल्या ग्रंथांची विभागणी पुढील प्रमाणे होती. १) राजकारणावर – ३०००, २) इतिहासावर – २६००, ३) धर्मविषयक – ३०००, ४) वाङमय – १३००, ५) चरित्रे – १२००, ६) अर्थशास्त्र – १००, ७) अहवाल वृतांत १०००, ८) मराठी – ८००, ९) तत्वज्ञान ६००, १०) हिंदी– ५००, ११) भाषणे – ६००, १२) युध्दविषयाची -३०९, १३) संदर्भविषयक – ४०० अशी १५२०९ ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयात होती. याव्यतिरिक्त त्यांनी स्वतः लिहिलेले ग्रंथ वेगळेच होते. ते पुढील प्रमाणे : १) ईस्ट इंडिया कंपनी – प्रशासन आणि अर्थनीती २) भारतातील जातीसंस्था
तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास ३) ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती ४) रुपयाचा प्रश्न – उद्गम आणि उपाय ५) संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य ६) पाकिस्तान अथवा भारताची फाळणी ७) जातीचे निर्मुलन ८) रानडे, गांधी आणि जिना ९) गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती १०) जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग ११) कॉंग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले ? १२) संस्थाने आणि अल्पसंख्यांक १३) शुद्रपूर्वी कोण होते १४) महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत १५) हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनिती १६) हिंदू धर्मातील कोडे १७) भाषिक राज्यासंबंधी विचार १८) पाली, व्याकरण. शब्दकोश आणि बौद्ध पुजापाठ १९) क्रांती आणि प्रतिक्रांती २०) बौद्धधम्म आणि साम्यवाद २१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म इत्यादी ग्रंथांची निर्मिती डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी केली.
निष्कर्ष :
1. अस्पृश्य जातीत जन्मल्यामुळे डॉ. बाबासाहेबांचा पदोपदी शाळेत, महाविद्यालयात, कार्यालयात, गाडीत, देवालयात तेजोभंग झाला, मानहानी झाली, अपमान झाला पण त्यांनी वाचन विद्यासंग नित्य सतत कायम ठेवल्यामुळे अमानुष रूढी, अंधश्रद्धा, ब्राम्हणी रोगट वाईट परंपरा नष्ट करून नवा वैज्ञानिक दृष्टीकोन समाजाला आणि देशाला दिला.
2. प्राध्यापक सेलीग्मन म्हणतात ‘आंबेडकरांनी हाताळलेला प्रश्न जगातील विचारवंतांच्या चर्चेतील एक महत्वाचा विषय असून या विषयाचा इतका सखोल आणि सांगोपांग अभ्यास कोणी केल्याचे माहित नाही’ अश्याप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती भारतातच नाही तर परदेशात सुद्धा होती.
3. पुस्तके म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा, पुस्तके म्हणजे त्यांचे आप्तेष्ट, सर्वस्व पुस्तके मिळाली कि, त्यांची तहान-भूक हरवत असे, परीवारापेक्षाही त्यांनी पुस्तकावर प्रेम केले. त्यांना जवळ केले.
4. ज्ञान नाकारलेल्या समाजात जन्माला येऊनही ज्ञानाचे सर्वोच्च प्रतिक म्हणून आजत्यांची ख्याती आहे. आज ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून ते तेजाने तळपत आहेत.
:: संदर्भ ग्रंथसूची ::
1) खैरमोडे चांगदेव भवानराव ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड १’, सुगावा प्रकाशन, पुणे, सातवी आवृत्ती एप्रिल २०१३, पृ. ७८,७९,८०,८७,९०,९१,९३,९७
2) कीर धनंजय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पाचवी आवृत्ती १४ एप्रिल २०१६, पृ. ३३,३४,३५,३६,३७,३८
3) भगत आचार्य सुर्यकांत (संपादक) ’ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ सुधीर प्रकाशन वर्धा, प्र. आ. ११ जुलै २००७, पृ. २८,३०,३१,४०,४८,५०,५९
4) जाधव डॉ. नरेंद्र, ‘प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर समग्र वैचारिक चरित्र’ प्र. आ. २ फेब्रु. २०१४, पृ.१२,१३,१४,१५,१६,१९,३६,३७,५२,५३,५४
5) लोकराज्य, एप्रिल २०१६, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन, पृ.१०, ११
6) लोकराज्य, एप्रिल २०१८, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन, पृ.३२,३३,३४,३५
7) महामानव, १४ एप्रिल २०१७, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन,पृ. ५
8) कांबळे बबन (संपादक), ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’ शतकोत्तर रोप्य महोत्सवी महाविशेषांक, गुरुवार दि. १४ एप्रिल २०१६, पृ. २४
9) Meshram Puranchand, (Published) ‘Dr. babasaheb Ambedkar The Architect of Modern India’, 125 th Birth Anniversary, RTM Nagpur University, 2016,
प्रा. डॉ. किशोर शेषराव चौरे
इतिहास विभागप्रमुख महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर जि. चंद्रपूर
E-mail : chaurekishor12@gmail.com
Mobile No. 9028616685