Tuesday, April 21, 2026
HomeChandrapurराजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त मुलमध्ये सिंदूर तिरंगा यात्रा आणि महीला...
spot_img

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त मुलमध्ये सिंदूर तिरंगा यात्रा आणि महीला मेळाव्याचे आयोजन

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त मुलमध्ये सिंदूर तिरंगा यात्रा आणि महीला मेळाव्याचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आदर्शांतून समाजसेवेचा संकल्प करा-आ. सुधीर मुनगंटीवार

Shreyash Wankhede: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रीशक्तीचा शाश्वत आणि तेजस्वी वारसा समाजापुढे ठेवला आहे. राज्यकारभार सांभाळताना त्यांनी आदर्श समाजाची रचना केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नारीशक्ती पुढे आली, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संकल्पनेतील समाज साकार होईल. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा संकल्प करा, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त मुल येथे चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात ‘सिंदूर तिरंगा यात्रा’च्या माध्यमातून महिला शक्तीने उत्स्फूर्तपणे देशभक्तीचा जल्लोष साजरा केला. भाजपाच्या युवा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात “भारत माता की जय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, महीला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महीला मोर्चा अध्यक्ष वंदना शेंडे,महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रत्नमाला भोयर, मंगेश गुलवाडे, उषाताई शेंडे, चंदू मारगोनवार, किरणताई बुटले, नीलम सुरमवार, डॉ. किरण कापगते, शर्मा मॅडम, नम्रता ठेमस्कर, वीरमाता ताराबाई आत्राम, जनाबाई दास आदी उपस्थित होते.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीला अभिवादन करत महिलांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आत्मनिर्भरता, आत्मसन्मान आणि सामाजिक परिवर्तनाचा वसा घ्यावा, असे आवाहन यावेळी केले. त्यांनी वीरमातांचा सन्मान करत त्यांच्यासमोरील त्यागाला नतमस्तक होत देशसेवेचा संकल्प केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण आपण आज ३०० वर्षांनंतरही करतो, यामागे एकच कारण आहे. त्यांनी भूभाग जिंकण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी राज्य केले. गरिबांना न्याय मिळावा, जनतेला पाणी व अन्न मिळावे यासाठी त्यांनी राज्यकारभार केला. त्यांनी समाजासाठी विहिरी बांधल्या, अन्नछत्रे सुरू केली. काशी विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात योगदान दिले. समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वाहिलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आर्दश घेत आपण समाजाची सेवा करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही श्री. मुनगंटीवार यांनी केले.

आमदार श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, एक आई आपल्या मुलाला देशाच्या रक्षण करताना गमावते, ही भावना शब्दातीत आहे. आपल्या रक्षणासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य महिनोन्‌महिने सीमांवर असतात. या मातांच्या त्यागाला माझा सलाम. आपण जर खरंच पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करायचे असेल, तर त्यांच्या मार्गावर चालत समाज आणि देशसेवेसाठी एकत्र येत, समाजाची प्रगती केली पाहिजे हीच खरी आदरांजली ठरेल, असेही आवाहन त्यांनी केले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page