चांदा बोळीत मुरूमाची खुली लूट
ब्रह्मपुरीत खुली लूट सुरू : शासनाच्या महसुलाची खुलेआम चोरी, अधिकारी झोपेत

Shreyash Wankhede:
ब्रह्मपुरी शहरातील बोंडेगाव रोडलगत चांदबोडी तलावालगत एका शेतात सुरू असलेला मुरूम भराईचे काम हे संपूर्णपणे बिनरॉयल्टी असून शासनाच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. हे काम इतक्या गुपचूप आणि सुसज्ज पद्धतीने करण्यात येत आहे की, यामागे राजकीय वरदहस्त आणि प्रशासनातील काही अधिकार्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय अशक्यच आहे.
सदर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आठ ते दहा फूटांपर्यंत मुरूम भरण्याचे काम सुरू असून, यासाठी लागणारी कायदेशीर रॉयल्टी शासनाला अदा न करता, बिनधास्तरित्या हजारो ब्रास मातिमुरूम भरणे सुरू आहे. याचा थेट परिणाम शासनाच्या महसुलावर होत आहे. रॉयल्टीद्वारे शासनाच्या तिजोरीत जमा होणारे लाखो रुपये या मुरूम माफियांकडून सरळ सरळ चोरले जात आहेत.
हा प्रकार एखाद्या सामान्य माणसाचा नसून, यामागे प्रस्थापित राजकीय पाठबळ असलेले राजकारणी आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते. ब्रह्मपुरी परिसरात अलीकडच्या काळात विविध ठिकाणी सुरू असलेल्या लेआउट व व्यावसायिक बांधकामांमध्येही अशाच प्रकारे बिनरॉयल्टी मुरूम वापरण्यात आल्याचे स्पष्ट दिसते.
उघडपणे होत असलेल्या या लूटीत महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अजूनही कारवाईस उतरत नसल्याने एकच प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे; या भ्रष्टाचारातून त्यांनाही वाटा मिळतोय का?
|
“पगार घेतो सेवा करण्यासाठी, पण काम करतो चोरांसाठी?”
सरकार पगार देऊन ज्या अधिकाऱ्यांना जनतेची सेवा करायला ठेवते, तेच अधिकारी अशा चोरट्या मुरूम माफियांना पाठीशी घालत असतील, तर या अधिकाऱ्यांना शासकीय लोकसेवक म्हटले पाहिजे, की दलाल?शासनाने याची गंभीर दखल घेऊन, या प्रकारात सामील असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी करून तातडीने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. |
|








