
Jyotsna Wankhede : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीसी आयच्या कापूस खरेदी प्रक्रियेत बदल करण्याची मागणी तीव्र झाली आहे. सद्यस्थितीत सीसीआयने प्रति एकर ५.६० क्विंटल इतकी मर्यादा निश्चित केली आहे. मात्र ही मर्यादा शेतकऱ्यांच्या वास्तविक उत्पादन क्षमतेपेक्षा अत्यल्प असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी या संदर्भात सीसीआयच्या महाप्रबंधकांना तसेच राज्य शासनाला निवेदन देऊन कापूस खरेदीची मर्यादा एकरी १२ क्विंटलपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. वाढत्या उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे जास्त उत्पादन यांचा विचार करता विद्यमान मर्यादा शेतकऱ्यां च्या हिताविरुद्ध असल्याचे डॉ. रोडगे यांनी नमूद केले. शेतकऱ्यां कडून बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि निवेदने येत असल्यामुळे हा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे. मर्यादा वाढल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असे मत कृषी तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.या मागणीला आता शेतकरी संघटनांकडूनही पाठिंबा मिळू लागला असून लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे. शासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना दिलासा देईल अशी अपेक्षा याप्रसंगी सर्वांनी व्यक्त केली आहे.