Friday, June 19, 2026
HomeChandrapurखेळामधून होतो व्यक्तिमत्वाचा विकास - अपर पोलिस अधिक्षक कातकडे
spot_img

खेळामधून होतो व्यक्तिमत्वाचा विकास – अपर पोलिस अधिक्षक कातकडे

खेळामधून होतो व्यक्तिमत्वाचा विकास – अपर पोलिस अधिक्षक कातकडे

चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन 

चंद्रपूर( जीमाका): खेळामध्ये यश-अपयश या गोष्टीची पर्वा न करता मुलांनी प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यावा. त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. आपल्या मुलांना मैदानी खेळ तथा कला कौशल्य जोपासू द्या, असे आवाहन अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास नागपूरचे विभागीय उपायुक्त दत्तात्रय मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर, सदस्य वनिता घुमे, ज्योत्स्ना मोहितकर, महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, आदी उपस्थित होते.

उपायुक्त दत्तात्रय मुंडे यांनी स्पर्धेत सहभाग घेतांना यशाची पर्वा न करता सहभाग घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या व चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाळूंना विभागीय तथा राज्यस्तरावर संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल करण्यात येणाऱ्या अनाथ, निराधार, निराश्रीत ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, असे बालक व विधी संघर्षग्रस्त बालके, बालसंगोपन योजनेचे लाभार्थी तसेच शाळांमध्ये शिकत असलेले सर्वसामान्य बालके यांच्यामध्ये एकमेकांविषयी  बंधूभाव निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता 7 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात कौटूबिंक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, बालकामगार प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, बालशोषण प्रतिबंधावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तथा महिला व बालविकास विभागाच्या केंद्र पुरस्कृत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, बालगृह योजना, मिशन शक्ती अंतर्गत महिला हेल्पलाईन 181, महिला सक्षमीकरण केंद्र,  सखी वन स्टॉप सेंटर, शक्तिसदन, वर्किंग वूमन हॉस्टेल, कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, अनाथ प्रमाणपत्र, बालसंगोपन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, परिविक्षा अधिनियम  आदी योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.

विद्यार्थ्यांचा मानसिक, शारिरीक व कौशल्यात्मक विकास व्हावा व बालगृहातील मुलांना बाहेर जगातील स्पर्धांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण व्हावे, यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजूरकर यांनी केले तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे यांनी मानले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page