Saturday, September 19, 2026
spot_img
HomeChandrapurबांबू केवळ वनसंपदा नव्हे, तर रोजगार-उद्योगाचा ‘कल्पवृक्ष’ - आ. सुधीर मुनगंटीवार

बांबू केवळ वनसंपदा नव्हे, तर रोजगार-उद्योगाचा ‘कल्पवृक्ष’ – आ. सुधीर मुनगंटीवार

बांबू केवळ वनसंपदा नव्हे, तर रोजगार-उद्योगाचा ‘कल्पवृक्ष’ – आ. सुधीर मुनगंटीवार

वनमंत्री असताना चंद्रपुरात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची मुहूर्तमेढ; ‘वन ते धन’च्या संकल्पनेतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा

संशोधन, उत्पादन, प्रक्रिया, विपणन आणि निर्यातीतून बांबूला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा आ.मुनगंटीवार यांचा निर्धार


*Jyotsna Wankhede* : माणसाच्या जगण्याच्या असंख्य गरजांशी निसर्गाने जोडलेली काही मोजकीच साधने आहेत; त्यापैकी बांबू हा केवळ एक वनस्पती नसून अन्नापासून निवाऱ्यापर्यंत, शेतीपासून उद्योगापर्यंत आणि रोजगारापासून अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक शक्यतांची दारे उघडणारा बहुगुणी स्रोत आहे. ग्रामीण, आदिवासी आणि वनक्षेत्रातील हजारो हातांना काम देण्यापासून मोठ्या उद्योगांना कच्चा माल उपलब्ध करून देण्यापर्यंत बांबूमध्ये विकासाचे मोठे सामर्थ्य दडलेले आहे. या सामर्थ्याकडे केवळ वनसंपत्ती म्हणून नव्हे, तर ‘वन ते धन’ या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित करत माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बांबूचे महत्त्व स्पष्ट केले. बांबू केवळ वनसंपदा नव्हे, तर रोजगार-उद्योगाचा ‘कल्पवृक्ष’ असे ते म्हणाले.जागतिक बांबू दिवसाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील वन अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमाला अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन, बी.आर.टी.सी.चे संचालक उमेश वर्मा, सहाय्यक संचालक हनुमंत जाधव, डाक विभागाचे संचालक डॉ. सुधीर जाखेरे, बी.आर.टी.सी.च्या शैक्षणिक सल्लागार डॉ. तारिका दगडकर तसेच एफ.डी.सी.एम.च्या प्रादेशिक व्यवस्थापक दिव्या भारती आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बांबूपासून साकारलेल्या विविध कलात्मक व उपयुक्त वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणी केली. बांबूच्या माध्यमातून पारंपरिक कौशल्याला आधुनिक बाजारपेठेची जोड देत रोजगार, उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याची क्षमता या प्रदर्शनातून प्रकर्षाने अधोरेखित झाली.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बांबूच्या व्यापक उपयोगिता आणि भविष्यातील संधींवर यावेळी प्रकाश टाकला. समाजाच्या अनेक मूलभूत गरजा एकाच वनस्पतीतून पूर्ण करण्याची क्षमता असेल, तर ती बांबूमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत बांबू महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.बांबूचे महत्त्व सांगताना आ. मुनगंटीवार यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. घरातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंपासून ते शाळेतील शिक्षकांच्या छडीपर्यंत बांबूचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. माणसाच्या जीवनातील अनेक टप्प्यांशी बांबूचे नाते जोडलेले आहे; अगदी जीवनाच्या अंतिम प्रवासात अंत्यसंस्कारासाठीही त्याचा उपयोग होतो, असे सांगत त्यांनी बांबू आणि मानवी जीवनातील अतूट संबंध अधोरेखित केला.

बांबूच्या सामर्थ्याचा अभ्यास आपण २०१३ मध्येच केला होता आणि त्यानंतर विधानसभेत या विषयावर चर्चा उपस्थित केली, अशी आठवण आ. मुनगंटीवार यांनी सांगितली. २०१४ मध्ये वनमंत्री झाल्यानंतर चंद्रपूर येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला. ४ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणण्यात आला, आणि मंजुरी मिळाली असे त्यांनी स्पष्ट केले. वनमंत्री म्हणून घेतलेल्या या निर्णयामागे बांबूला केवळ वनसंपत्ती न मानता संशोधन, प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योगनिर्मितीचे माध्यम बनविण्याची दूरदृष्टी होती. आज चंद्रपूरमधील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने देशातील बांबूविषयक ज्ञान, संशोधन आणि प्रशिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चंद्रपूरचे केंद्र, देशाचे बांबू हब बनावे

देशातील तसेच परदेशातील बांबूविषयक संस्था, विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांशी सामंजस्य करार करून संशोधनाला गती देण्याची गरज आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. चंद्रपूरमध्ये बांबू संशोधनासोबतच उत्पादन, प्रक्रिया, डिझाइन, मूल्यवर्धन आणि प्रशिक्षणाची मजबूत परिसंस्था उभी राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.बांबूपासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठेत चीनचा मोठा सहभाग असल्याचा उल्लेख करत त्यांनी भारताने या क्षेत्रात आपली क्षमता वाढविण्याची गरज व्यक्त केली. चंद्रपूरमधील संशोधन आणि उत्पादन केंद्रांना अधिक सक्षम करून बांबूच्या क्षेत्रात भारताची स्पर्धात्मक ताकद वाढविणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बांबूपासून असंख्य उद्योगांच्या संधी

बांबूपासून कागद, फर्निचर, कापड, कोळसा, बायोचार, बायोमास तसेच विविध कृषी उपयोगाच्या वस्तू तयार करता येतात. शेतकऱ्यांसाठी कुंपणासह अनेक उपयुक्त वस्तू बांबूपासून तयार करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.बांबूपासून तयार होणाऱ्या कापडाच्या पर्यावरणपूरक गुणधर्मांवरही त्यांनी प्रकाश टाकला. बांबूच्या कापडामध्ये मऊपणा, तापमान नियंत्रित करण्याची क्षमता आणि जीवाणूरोधक गुणधर्म आढळतात, अशी माहिती देत भारतातील मोठ्या वस्त्रोद्योगाला बांबूच्या कापडातून नवा आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘वन ते धन’चा मंत्र; जंगलातून रोजगार आणि समृद्धी

जंगलाकडे केवळ वनसंपत्ती म्हणून पाहण्याची मानसिकता बदलून ‘वन ते धन’ हा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. वनसंपदेतून रोजगार, उद्योग आणि आर्थिक विकासाच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बांबू प्रभावी माध्यम ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.देशाच्या आर्थिक विकासासाठी केवळ मोठ्या शहरांवर अवलंबून न राहता गाव, जंगल आणि दुर्गम भागातील अर्थव्यवस्थेला बळ देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. बांबू उद्योगाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

‘वन प्रॉडक्ट वन डिस्ट्रिक्ट’मध्ये बांबूला महत्त्वाची भूमिका

चंद्रपूर जिल्ह्याचा सकल जिल्हा उत्पादन (GDP) वाढविणे हे उद्दिष्ट असून त्यासाठी बांबू उद्योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘वन प्रॉडक्ट वन डिस्ट्रिक्ट’ या संकल्पनेत बांबूला प्रभावी स्थान देता येईल. बांबूच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनाला बाजारपेठ, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
बांबूच्या नव्या प्रजाती, नर्सरी, लागवड, उत्पादन, प्रक्रिया, डिझाइन, मूल्यवर्धन आणि विपणन या प्रत्येक टप्प्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. बांबूपासून तयार होणारी उत्पादने डी-मार्ट, ॲमेझॉन, रिलायन्स यांसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी विपणन व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

बायोमास, बायोचार आणि ऊर्जा क्षेत्रातही मोठ्या शक्यता

बांबूपासून बायोमास, बायोचार आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादने तयार करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात भारताने आणखी संशोधन आणि विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

केंद्र सरकारसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याचा पाठपुरावा

बांबू क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त राष्ट्रांसह देशातील विविध संशोधन, वन आणि तंत्रज्ञानविषयक संस्थांचे सहकार्य घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बांबू संशोधन, प्रशिक्षण आणि उद्योगविकासासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले.

जागतिक बांबू दिन संकल्पाचा दिवस ठरावा

जागतिक बांबू दिन हा केवळ कार्यक्रम, भाषणे आणि पुरस्कारांपुरता मर्यादित न राहता भविष्यातील कामाचा संकल्प करण्याचा दिवस ठरला पाहिजे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त विद्यार्थी आणि संशोधकांनी पुढेही संशोधन, नवकल्पना आणि प्रयोगशीलतेवर सातत्याने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बांबूला ‘ग्रीन गोल्ड’ संबोधत त्याचा शाश्वत विकास, रोजगार आणि अर्थव्यवस्थेशी संबंध जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योगनिर्मिती करून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हीदेखील देशसेवाच आहे, असे सांगत बांबूच्या माध्यमातून चंद्रपूरच्या विकासाला नवी आर्थिक दिशा देण्याचा निर्धार आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page