Sunday, May 31, 2026
HomeChandrapurराजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये “सन्मान… स्त्री कर्तृत्वाचा” कार्यक्रम उत्साहात
spot_img

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये “सन्मान… स्त्री कर्तृत्वाचा” कार्यक्रम उत्साहात

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये “सन्मान… स्त्री कर्तृत्वाचा” कार्यक्रम उत्साहात

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

Jyotsna Wankhede : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथे “सन्मान… स्त्री कर्तृत्वाचा” हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्व. छोटुभाई पटेल सभागृह, आरसीईआरटी कॅम्पस येथे आयोजित या कार्यक्रमाला मान्यवरांची तसेच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरचे अध्यक्ष विनोदजी दत्तात्रेय होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर वन अकादमीच्या उपसंचालक अश्विनी जाधव तसेच जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरणाबाबत आपले विचार व्यक्त करत महिलांचे समाजातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. आजच्या काळात महिला शिक्षण, प्रशासन, आरोग्य, समाजकारण, उद्योग, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असून समाजाच्या प्रगतीत त्यांचे योगदान मोठे असल्याचे मान्यवरांनी सांगितले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम प्रेरणादायी ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला एस.पी.एम.एस. संस्थेचे सचिव जयंत वेलंकीवार, कोषाध्यक्ष निनाद गड्डमवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, प्रा. योगेंद्र परिहार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्ती परवीन पठाण यांनी महिलांचे हक्क, महिला हिंसाचार तसेच बालकांवर होणारे अत्याचार या गंभीर विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियान राबविले आहे. या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांना कायदे, सुरक्षा आणि त्यांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन केले.

छबुताई वैरागडे यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. महिलांना आधार व मार्गदर्शन देत समाजप्रबोधनाचे कार्य त्या करीत आहेत.

उषा अशोक बुक्कावार या “समाजसेवा ही केवळ कर्तव्य नसून ती एक आत्मिक अनुभूती आहे” या विचाराने प्रेरित होऊन गेली चोवीस वर्षे समाजहितासाठी सातत्याने कार्य करत आहेत.

डॉ. संगीता पोटले या सन 2003 पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांना एकूण 23 वर्षांचा अनुभव आहे. यापैकी 15 वर्षांचा अनुभव HIV/AIDS क्षेत्रात तर 20 वर्षांचा अनुभव व्यसनमुक्ती (De-addiction) कार्यक्रमांमध्ये आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रशिक्षण व्यवस्थापन, मानवी संसाधन व्यवस्थापन, संस्थात्मक सल्लागार सेवा, संशोधन व्यवस्थापन, फील्ड मॅनेजमेंट, समुपदेशन कौशल्य, जनजागृती व लोकसहभाग तसेच डेटा संकलन व विश्लेषण या क्षेत्रात त्यांना विशेष अनुभव आहे.

मीनाक्षी वाळके या सामाजिक कार्यात सक्रिय असून ‘बांबू’च्या माध्यमातून विविध प्रकारचे साहित्य तयार करून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत.

तसेच वर्षा कोडापे या सामाजिक, शैक्षणिक तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून परिवर्तनवादी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. युवा अवस्थेतच त्यांना महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप मिळाली होती. सन 2017 ते 2020 दरम्यान त्यांनी आदिवासीबहुल क्षेत्रात ग्रामीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

या सर्व महिलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची माहिती देत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच समाजात महिलांना समान संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी विश्वविक्रमी ‘महालावणीत’ राजीव गांधी इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनीं सहभाग घेतला होता. त्या चमूचा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page