Sunday, September 13, 2026
spot_img
HomeChandrapurआ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा...

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा देण्याच्या प्रक्रियेला वेग

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा देण्याच्या प्रक्रियेला वेग

आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली तात्काळ दखल

१५ दिवसांत श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाच्या ‘ब’ वर्ग दर्जाच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिवांना निर्देश


Jyotsna Wankhede: चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक व प्राचीन श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (नगर विकास) यांना पुढील १५ दिवसांत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मान्यता देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की चंद्रपूर शहराला सुमारे ८०० वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत या शहराने सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय परंपरा जोपासल्या आहेत. किल्ले, प्राचीन वास्तू आणि विविध देवस्थाने ही या शहराची ओळख ठरली असून माता महाकाली, श्री अंचलेश्वर आणि भगवान श्री विठ्ठल ही शहरवासीयांची आराध्य दैवते आहेत.

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर हे अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक देवस्थान असून अनेक दशकांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच उत्सवांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या मंदिराला चंद्रपूरच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान आहे.

दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून भव्य रथयात्रा काढण्यात येते. हा रथ संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करतो आणि या सोहळ्यात हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. शहरातील विविध भागांतील नागरिक, महिला मंडळे तसेच वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा चंद्रपूरच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. विठू नामाचा गजर करत भाविक सतत या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.सध्या दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असून उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता भासते. मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यास शासन स्तरावरून आर्थिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन या सुविधा अधिक सक्षमपणे विकसित करता येतील. हे मंदिर चंद्रपूर शहरातील नागरिकांचा भावनिक ठेवा असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाच्या नियमानुसार ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा यासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीचा ठरावही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार पारित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित अतिरिक्त मुख्य सचिव (नगर विकास) यांना आवश्यक कार्यवाही करून पंधरा दिवसांत मान्यता देण्याचे निर्देश दिल्याने चंद्रपूरच्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page