ज्योत्स्ना वानखेडे: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन रविवारी (दि. १५) गोंदियातील लिटिल फ्लॉवर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य तथा विमाशीचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले होते.
अधिवेशनाचे उद्घाटन माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या हस्ते झाले. तर नगर परिषद गोंदियाचे नगराध्यक्ष सचिनभाऊ शेंडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रांतीय उपाध्यक्ष श्री. रमेश काकडे, विभागीय कार्यवाह श्री. चंद्रशेखर रहांगडाले, महा. राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष श्री. वितेश खांडेकर, श्री. समीर बैस, श्री. निरज कटकवार, शिला बिसेन, श्री. तेजसिंग बिसेन, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. डी. एस. हुकरे, श्री. अरविंद शरणागत, श्री. भोजराज फुंडे, श्री. रतन वासनिक, श्री. सुनील शेरकी, श्री. दीपक धोपटे, श्री. सुरेंद्र अडबाले, श्री. अनिल गोतमारे, श्री. संजय वारकर, श्री. हिमांशू बिसेन, श्री. रवींद्र नैताम, श्री. अजय लोंढे, श्री. सुधाकर देशमुख, श्री. महेंद्र सालंकार, श्री. रेशीम कापगते सर, विनोद चव्हाण, श्री. शशिकांत कापगते, श्री. प्रदीप राठोड, प्रा. शरणाम, श्री. शशी मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या व शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सविस्तर भाष्य केले. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी संघटितपणे लढा देणे गरजेचे असून समस्या सोडवण्यासाठी आंदोलन हाच संघटनेचा आत्मा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनातूनच न्याय मिळत असल्याने पुढेही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना नियमित मानधन मिळावे तसेच तासिका तत्वावावरील दहा वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षकांचे शाळांमध्ये समायोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच १ ते ८ वीच्या शिक्षकांच्या टीईटी संदर्भातील प्रश्न सभागृहात मांडल्याचे सांगत याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली. मराठी माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांवर वाढत असलेल्या अशैक्षणिक कामांच्या बोजाविरोधात संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी केवळ विद्यादानाचे कार्य करावे, यासाठी संघर्ष सुरू राहील, असेही ते म्हणाले. जुनी पेन्शन योजना, पदोन्नती, संचमान्यता, जीपीएफ, डीसीपीएस व एनपीएस खात्यांतील समस्या, आयटीआय, आश्रमशाळा तसेच आदिवासी व समाजकल्याण विभागांतर्गत शाळांमधील प्रश्नांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली असली तरी त्याचा लाभ मर्यादित शिक्षकांनाच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंगराळ व नक्षलग्रस्त दुर्गम भागातील शाळांसाठीचे निकष बदलण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. शासनाच्या विरोधातील चळवळीतील प्रतिनिधी सभागृहात पोहोचल्यास शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यास मदत होईल, असेही आमदार सुधाकर अडबाले यांनी नमूद केले.
उद्घाटनप्रसंगी व्ही. यू. डायगव्हाणे यांनी शिक्षण क्षेत्रात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून शिक्षण व्यवस्था विस्कळीत होत असल्याची खंत व्यक्त केली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे, नवनियुक्त नगरसेवक सुरेंद्र अडबाले यांचा सत्कार करण्यात आला.
या अधिवेशनाला गोंदिया जिल्ह्यांतील शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सचिन राठोड सर यांनी तर आभार प्रदर्शन रेश्मा बिसेन मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष ओ. एस.गुप्ता, जिल्हा कार्यवाह संदीप मांढरे, कार्याध्यक्ष महेंद्र बढे, हिमांशू बिसेन, अशोक नागपुरे, राजेंद्र झाडे, राजेश सलामे, सचिन राठोड, सूर्या केंद्रे, अनिल मुरकुटे, अजय भिवगडे, जे टी शेंद्रे, रंजित राठोड, रतन वासनिक, दिनेश बहेकार,पी एम हनवते, महेंद्र रहाणंगडाले, महेंद्र हेमने, डी एस हुकरे, मनीष चंदणकर, के एल पुसाम, कु शिराज शेख, सौ निशा ढोक, श्रीमती सुरेखा बघेल, श्रीमती वलिंद्रा देशभ्रतार, श्रीमती वंदना बिसेन, श्रीमती सी एच बोपचे तसेच तालुका पधादिकारी, कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.