सेलूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.
ज्योत्स्ना वानखेडे: सेलू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ( दि. 23 ) रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या नियोजन बैठकीस परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी भेट देऊन सुसंवाद साधला. या प्रसंगी सेलूचे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांची उपस्थिती होती. बैठकीत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि जयंती समितीचे अध्यक्ष सुबोध काकडे यांचा सत्कार केला. बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचे ठरले. रविवार दि.05 एप्रिल रोजी अठरा तास अभ्यास उपक्रम राबविला जाणार आहे.रविवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आधारित भव्य तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. सामान्यज्ञान स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व अकरावी ते पदव्युत्तर या तीन गटात संपन्न होणार आहे. तिन्ही गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक तीन हजार, द्वितीय दोन हजार व तृतीय क्रमांकास एक हजार रुपये, संविधान प्रत बक्षीस देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान स्पर्धत सहभागी व्हायचे आहे. त्यांनी आपली नाव नोंदणी मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके (९५६१८७४०६३), गंगाधर अवचार ( ८००७५८१९९१), प्रा. सुमेध आवटे ( ९४२०४३२३८८ ) यांच्याकडे पाच एप्रिल पर्यंत नावे लिहून द्यावीत असे आवाहन करण्यात आले. शहरातील नगर परिषदेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मंगळवार (दि. 14 ) रोजी अभिवादन करून सकाळी आठ वाजता सामुहिक बुध्द वंदना होणार आहे.सोमवार दि. 20 एप्रिल रोजी साई नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध विचारवंत उत्तम कांबळे (नाशिक) यांचे व्याख्यान होणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवार दि. 24 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम होईल.अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत, अध्यक्ष सुबोध काकडे यांनी दिली. सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.