मक्का खरेदीसाठी १ एप्रिल ते ३० एप्रिल ऑनलाईन नोंदणी सुरू !
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
शेतकऱ्यांच्या हितासाठी मुनगंटीवारांची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित

Jyotsna Wankhede : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळावी, तसेच त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. रब्बी पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान व भरडधान्य (मक्का) खरेदीसाठी १ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमार्फत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना याबाबत आदेश प्राप्त झाले असून, संबंधित खरेदी केंद्र व खरेदी संस्थांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांना पत्र लिहून मक्का खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याची ठाम मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागरूक राहणारे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता, तो शेतकऱ्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्न म्हणून गांभीर्याने हाताळला. त्यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत संबंधित यंत्रणांशी संवाद साधला आणि मक्का उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या या पुढाकारामुळे अखेर मक्का खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
जिल्ह्यातील अनेक शेतकरी मक्का पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. मात्र, खरेदी व्यवस्थेतील विलंब, बाजारपेठेचा अभाव आणि योग्य दर न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही परिस्थिती ओळखून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत त्या शासनापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करून शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होता येणार असून, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करून शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होता येणार असून, त्यांच्या उत्पादनाला हमीभावाने विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण ठेवून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे, त्यांच्या घरात आर्थिक स्थैर्य यावे, हीच भावना त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे असून, आ.मुनगंटीवार यांची ही संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








