वर्धा जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्यांबाबत बैठक
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अनेक प्रकरणे निकाली
ज्योत्स्ना वानखेडे : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था / खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील कार्यरत शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ सहविचार सभा १० एप्रिल २०२६ रोजी स्व. सिंधुताई सपकाळ सभागृह, जिल्हा परिषद वर्धा येथे पार पडली. तब्बल सात तास चाललेल्या सहविचार सभेत आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली.
सभेत सुरुवातीला कोषागार अधिकारी कार्यालयाशी सबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन, शून्य शिक्षकी शाळा, वेतनेतर अनुदान, प्रलंबित मान्यता / शालार्थ आयडी, थकबाकी देयके, वैद्यकीय देयके, अर्जित रजा रोखीकरण, वरिष्ठ / निवड श्रेणी प्रकरणे, सेवानिवृत्ती, अनुकंपा प्रकरणे, वेतन व अन्य प्रलंबित विविध सामुहिक व वैयक्तिक १२० विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दिलेल्या विषय सूचीतील बरेच प्रकरणे निकाली काढण्यात आली. उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. माध्यमिक विभागाची सभा साडेचार तास चालली.
यानंतर प्राथमिक विभागातील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिल्या. ही सभा अडीच तास चालली.
सदर सभेला माजी आमदार श्री. व्ही. यू. डायगव्हाणे, शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती जयश्री राऊत, उपशिक्षणाधिकारी श्री. महेंद्र गजभिये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. मनोज पाते, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती सीमा पाटील, उपशिक्षणाधिकारी श्री. कांबळे, श्री. पानसरे, कोषागार अधिकारी श्रीमती चिंचोलकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू इटनकर, जिल्हा कार्यवाह श्री. महेंद्र सालंकार, कार्याध्यक्ष पांडुरंग भालशंकर, खासगी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. रवीबाबू शेंडे, जिल्हा सचिव श्री. सुरेशकुमार बरे, म. रा. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष श्री. वऱ्हाडे, रवींद्र वाघमारे, विमाशी संघाचे कोषाध्यक्ष शशांक हुलके, सहकार्यवाह नंदकिशोर ठाकरे, मंदा चौधरी, संघटन सचिव संदीप चवरे, सुनील दुम्पलवार, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे, सुहास गवते, दिनेश वाघ, राजू चंदनखेडे, राजेंद्र वसु, रितेश निमसडे, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सदस्य तसेच समविचारी संघटनांचे पदाधिकारी व समस्याग्रस्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.