अत्यंत जलद नियोजनबद्ध व कौशल्यपूर्ण कारवाई करत गंभीर खून प्रकरणातील आरोपींना अवघ्या 24 तासांच्या आत अटक
Jyotsna Wankhede:
बल्लारपूर पोलिसांनी अत्यंत जलद नियोजनबद्ध व कौशल्यपूर्ण कारवाई करत गंभीर खून प्रकरणातील आरोपींना अवघ्या 24 तासांच्या आत अटक करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
दिनांक: 15.05.2026 रोजी विसापूर येथील तुकडोजी चौक परिसरात विराज राजेश आगदारी वय 17 वर्षे याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता. सदर घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची दिशा निश्चित करून तात्काळ कार्यवाही सुरू केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण व स्थानिक माहितीच्या आधारे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून आरोपींचा मागोवा घेण्यात आला. आरोपी स्वत:ला लपविण्याच्या उद्देशाने जुने पावर हाऊस बल्लारपूर परिसरात थांबून असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून कारवाई केली. सदर कारवाईदरम्यान आरोपी 1) आकाश रामकरण निषाद वय 21 वर्षे 2) मोनू उर्फ रौनक सुखपाल निषाद वय 19 वर्षे 3) जिशान शफीक सिद्दीकी वय 18 वर्षे, 4) समीर कलीम खान वय 21 वर्षे आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विधिवत चौकशी करून अटक पूर्व वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करत अटक प्रक्रिया पार पाडण्यात आली.
या संपूर्ण कारवाईमध्ये प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गायकवाड, दिवटे, पठाण, पोलीस उपनिरीक्षक जंगमवार, जोगदंड व गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार/पोस्टॉप यांनी अत्यंत धाडस, सतर्कता व समन्वय दाखवत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून गंभीर गुन्ह्यांवर कठोर व तात्काळ कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धार अधोरेखित झाला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बल्लारपूर पोलीस सदैव कटिबद्ध असल्याचा ठोस संदेश या घटनेतून देण्यात आला.