सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, हा आमचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार
भारतीय जनता पार्टी चंद्रपूरच्या वतीने घुग्घुस येथे भव्य निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन

*Jyotsna Wankhede* : सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दारात दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य असून, कोणताही नागरिक केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), सामान्य रुग्णालय चंद्रपूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी घुग्घुस येथे भाजप कार्यालयात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, महामंत्री विवेक बोढे, सविता दंढारे, नामदेव डाहुले, वंदना हातगावकर, डॉ. तुषार ठाकरे, विनोद खेवले, महिला अध्यक्ष सुचिता लुटे, संतोष नुने, चिन्ना नरभोगा, गटनेता मीना मोरपाका, पूजा दुर्गम, नगरसेविका वैशाली ढवस, नगर सेवक गणेश पिंपळकर, प्रेमलाल पारधी, रामपाल वर्मा, संजय भोंगळे, राजकुमार गोडशेलवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आज अनेक नागरिक आर्थिक अडचणींमुळे योग्य वेळी उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे गंभीर आजार बळावतात. अशा परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत तपासणी, निदान आणि आवश्यक शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्यसेवा मिळाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.
ते पुढे म्हणाले की, या शिबिरात मेडिसीन, नेत्ररोग, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग तसेच कान-नाक-घसा आदी विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत. गरज भासल्यास पुढील उपचार, शस्त्रक्रिया आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांचाही लाभ रुग्णांना मिळवून दिला जाईल.
यावेळी त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रुग्णांची केवळ तपासणी करून थांबणार नाही, तर आवश्यक ते उपचार, शस्त्रक्रिया आणि शासनाच्या योजनांचा लाभही मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेचे आरोग्य हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले.









