Friday, July 3, 2026
HomeProjectचंद्रपूर टायगर सफारी प्रकल्पाला वेग, वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा...
spot_img

चंद्रपूर टायगर सफारी प्रकल्पाला वेग, वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक

चंद्रपूर टायगर सफारी प्रकल्पाला वेग, वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर वन्यजीव बचाव केंद्र आणि अत्याधुनिक रेस्क्यू प्रणालीवरही सविस्तर चर्चा

 *Jyotsna Wankhede*: जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबई येथील मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. बैठकीत चंद्रपूर येथील प्रस्तावित टायगर सफारी, वन्यजीव बचाव केंद्र तसेच अत्याधुनिक बहुउपयोगी वन्यजीव बचाव पिंजर्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीलामहाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग पखाले, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर आदिंची उपस्थिती होती.

             आमदार किशोर जोरगेवार यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्याचाच भाग म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात ही महत्त्वपूर्ण बैठक घेऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकार्यांनी प्रस्तावित व्याघ्र सफारी आणि वन्यजीव बचाव केंद्राच्या कामकाजाची सद्यस्थिती सादर केली.

            बैठकीदरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षित बचाव, स्थलांतर आणि व्यवस्थापनासाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक बहुउपयोगी बचाव पिंजर्याचे तांत्रिक सादरीकरण करण्यात आले. या आधुनिक प्रणालीच्या कार्यपद्धती, उपयुक्तता आणि तांत्रिक वैशिष्ट्यांची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांना देण्यात आली. भविष्यात वाघ, बिबट्या आणि इतर वन्यजीवांच्या बचाव मोहिमांमध्ये या प्रणालीचा मोठा उपयोग होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

             दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांच्यासोबत बैठक घेऊन टायगर सफारी प्रकल्पाला मंजुरी देण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्या बैठकीत महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी तसेच एफडीसीएम गोरेवाडा प्राणी संग्रहालय लिमिटेडचे सीईओ चंद्रशेखर बाला उपस्थित होते.

             चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमीजवळील सुमारे १७१ हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या या टायगर सफारी प्रकल्पासाठी अंदाजे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेडकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली असून, प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साऊथ अमेरिकन, साऊथ आफ्रिकन आणि इंडियन ट्रेल अशा विविध थीमवर आधारित प्राणीदर्शन क्षेत्र विकसित करण्यात येणार आहेत. याशिवाय वाहन सफारी, चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याचाही आराखडा आहे.

            आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, चंद्रपूर टायगर सफारी आणि वन्यजीव बचाव केंद्रामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल. ताडोबा येथे येणार्या लाखो पर्यटकांसाठी हा प्रकल्प आकर्षणाचे आणखी एक मोठे केंद्र ठरेल. स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, तसेच चंद्रपूरची ओळख राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे निर्माण होईल.

 मंत्रालयातील आढावा बैठकीमुळे आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे चंद्रपूरच्या महत्त्वाकांक्षी टायगर सफारी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page