धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजारांची प्रोत्साहनपर मदत द्या; विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ठाम आग्रह
पूर्व विदर्भासह कोकणातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सरकारकडे आ. मुनगंटीवार यांची भावनिक साद
आ. मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मंत्री छगन भुजबळ यांचा सकारात्मक प्रतिसाद; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन
*Jyotsna Wankhede*: पूर्व विदर्भासह कोकणातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, त्यांच्या घामाचे मोल ओळखून मागील वर्षाप्रमाणे यंदाही प्रति हेक्टर २० हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत जाहीर करावी, असा ठाम आग्रह राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेदरम्यान धरला. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा अत्यंत संवेदनशीलतेने मांडताना त्यांनी, “धानाचा बोनस हा शेतकऱ्यांचा हक्क असून त्यांच्या कष्टाचा सन्मान आहे. आपल्या ताटातील प्रत्येक भाताच्या घासामागे शेतकऱ्याचा घाम, संघर्ष आणि त्याग दडलेला आहे. त्या कष्टाचे मोल ओळखून शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” अशी भावनिक साद घालत तातडीने प्रोत्साहनपर मदत जाहीर करण्याची आग्रही मागणी केली.
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या धान उत्पादक जिल्ह्यांतील लाखो शेतकरी आजही शासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यापूर्वी सभागृहात धान उत्पादकांना मदत देण्याबाबत व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेची आठवण करून दिली. मागील वर्षी शासनाने प्रति हेक्टर २० हजार रुपयांची मदत दिली होती. यावर्षीही त्याच धर्तीवर मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आ. मुनगंटीवार यांनी आग्रही मागणी केली.
यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचा संदर्भ देत शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करणारा निर्णय घेण्याचे आवाहन केले. “आपल्या प्रत्येक शुभकार्यात तांदळाच्या अक्षतांना मंगल मानले जाते, पण त्या अक्षता पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्यात मात्र निराशेची छाया असू नये. रोज आपल्या ताटात वाढला जाणारा प्रत्येक भाताचा घास हा शेतकऱ्याच्या घामाने, कष्टाने आणि संघर्षाने तयार झालेला असतो. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अपेक्षा आणि त्यांच्या कष्टाचे मोल ओळखून शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा,” असे भावनिक आवाहन त्यांनी सभागृहात केले.
चर्चेला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेला विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत शासन पूर्णपणे सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग निश्चित काढण्यात येईल. धान उत्पादकांना मदत लवकरात लवकर कशी देता येईल, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदनांना विधानसभेत बुलंद आवाज देत त्यांच्या न्यायहक्कासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेली भूमिका सभागृहात विशेष लक्षवेधी ठरली. धान बोनस हा केवळ आर्थिक मदतीचा विषय नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा निर्णय असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. या चर्चेनंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय देणारा निर्णय शासन लवकरच घेईल, अशी आशा अधिक बळावली आहे.