Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeHealth & Fitnessकामगारांच्या आरोग्य-सुरक्षेलाच प्राधान्य; वाढदिवसानिमित्त नि:शुल्क धनुर्वात टी.टी. लसीकरणातून आ. सुधीर मुनगंटीवार यांचा...

कामगारांच्या आरोग्य-सुरक्षेलाच प्राधान्य; वाढदिवसानिमित्त नि:शुल्क धनुर्वात टी.टी. लसीकरणातून आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सेवाधर्म

कामगारांच्या आरोग्य-सुरक्षेलाच प्राधान्य; वाढदिवसानिमित्त नि:शुल्क धनुर्वात टी.टी. लसीकरणातून आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सेवाधर्म

कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील – आ. सुधीर मुनगंटीवार

कामगार मोर्चा चंद्रपूर जिल्हातर्फे बंगाली कॅम्प येथे शेकडो बांधकाम कामगारांसाठी नि:शुल्क धनुर्वात टी.टी. लसीकरण शिबिर

कामगारांसाठी आरोग्य शिबिरे, नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटपाचे उपक्रम राबविण्याचे आ.मुनगंटीवार यांचे आवाहन; २००४ घरांच्या उभारणीसह सर्वसामान्यांच्या जीवनमान उंचावण्याचा निर्धार

*Jyotsna Wankhede* : कामगारांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या सुरक्षिततेची जाणीव आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची संवेदनशील भूमिका जपत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार मोर्चा चंद्रपूर जिल्हातर्फे बंगाली कॅम्प येथे नि:शुल्क धनुर्वात टी.टी. इंजेक्शन लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेकडो बांधकाम कामगारांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार यांनी, “राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजातील वंचित, कष्टकरी आणि कामगारांच्या सेवेसाठी आहे,” असे सांगत कामगारांच्या आरोग्य, निवारा आणि सन्मानपूर्ण जीवनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही दिली.समाजातील श्रमिक घटकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि जीवनमान उंचावणे हेच आपल्या सार्वजनिक जीवनाचे ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, बंगाली कॅम्प येथे आयोजित कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित नागरिक, कामगार, महिला व ज्येष्ठांनी त्यांना शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, जनतेने दाखविलेला हा स्नेह आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजातील सामान्य, वंचित आणि कष्टकरी घटकांची अधिकाधिक सेवा करण्याचा संकल्प मी सातत्याने जपत आलो असून तो यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील.

यावेळी कामगारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेल्या टी.टी. लसीकरण उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना लहान-मोठ्या जखमा होण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत वेळेवर टी.टी. लस घेणे अत्यंत आवश्यक असून त्याचा संरक्षणात्मक प्रभाव साधारण सहा महिने कायम राहतो. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणारे असे उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज आहे.

आ. मुनगंटीवार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, केवळ वाढदिवसापुरतेच नव्हे तर वर्षभर कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबिरे, मोफत चष्मे वाटप, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. समाजातील सर्वसामान्य घटकांच्या आरोग्याची जबाबदारी ही सामाजिक बांधिलकी म्हणून स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बंगाली कॅम्प परिसराशी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित करताना आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, मंत्री असताना या परिसरातील मच्छी मार्केटच्या बांधकामासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या भागातील पायाभूत सुविधा मजबूत व्हाव्यात आणि गोरगरिबांचे जीवनमान उंचावावे, हा त्या मागचा उद्देश होता.

आ. मुनगंटीवार यांनी बांधकाम कामगारांच्या जीवनातील वास्तव मांडत सांगितले की, दररोज इतरांच्या स्वप्नातील घरे उभारणारे अनेक कामगार स्वतः मात्र हक्काच्या घरापासून वंचित राहतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व बांधकाम कामगार, गरीब कुटुंबे आणि स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यात २००४ घरांचे बांधकाम सुरू करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडे १० हजार घरांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी २६२ कोटी रुपये मंजूर झाले असून या माध्यमातून हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. मंगेश गुलवाडे, रुद्रनारायण तिवारी, मनोज सिंघवी, प्रज्वलंत कडू, उमेश अस्टणकर, नम्रता ठेमस्कर, नगरसेवक रवी लोणकर, सुनीता जयस्वाल, सविता सरकार, सुप्रिया सरकार तसेच कामगार मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सेवाभावी उपक्रमाचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक करत सर्व आयोजकांचे आभार मानले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page