अमरावती : शिक्षक पवन सुरजूसे यांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी अन् पालकांचा गवई ट्रस्टवर धडक मोर्चा
*ज्योत्स्ना वानखेडे*:
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय, अमरावती येथील लोकप्रिय शिक्षक श्री. पवन सुरजूसे यांची विहगांव येथे करण्यात आलेली प्रशासकीय बदली तत्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या मध्यवर्ती कार्यालयावर मोर्चा काढला. “आमच्या सरांची बदली रद्द झालीच पाहिजे”, अशा जोरदार घोषणा देत संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी परिसर गदगदून सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक श्री. पवन सुरजूसे हे आपल्या उत्कृष्ट अध्यापन शैलीमुळे आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीच्या नात्यामुळे अत्यंत प्रिय आहेत. मात्र, संस्थेच्या प्रशासनाने नुकतीच त्यांची अचानक विहगांव येथील शाळेत बदली केली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाले.
सकाळी शेकडोच्या संख्येने एकत्र येत विद्यार्थी आणि पालकांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयापासून मोर्चाला सुरुवात केली. हा मोर्चा थेट श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या मुख्य कार्यालयावर पोहोचला. मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन आपल्या लाडक्या शिक्षकांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
मोर्चा कार्यालयावर पोहोचल्यानंतर पालक व विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. “पवन सुरजूसे सर केवळ विषय शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध असतात. शैक्षणिक वर्षाच्या मध्यरात्री किंवा अशा प्रकारे अचानक झालेली बदली विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम करणारी आहे,” असा आरोप पालकांनी यावळी केला. तसेच, जोपर्यंत सुरजूसे सरांची विहगांव येथील बदली रद्द करून त्यांना पुन्हा अमरावती येथील शाळेत कायम केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रसंगी ट्रस्टच्या प्रतिनिधींनी निवेदनाचा स्वीकार करत, पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या भावना वरिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पोहोचवून यावर सकारात्मक आणि योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, या मोर्चामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी दिला आहे.