आमदारांच्या स्वीय सहाय्यक-वाहनचालकांच्या मानधनवाढीसाठी विधानसभेतील आ. सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका ठरली निर्णायक
स्वीय सहाय्यकांच्या मानधनात १० हजार, वाहनचालकांच्या मानधनात १० हजारांची वाढ; १ ऑगस्टपासून निर्णय लागू
आमदारांच्या कामकाजाचा कणा असलेल्या सहकाऱ्यांच्या कष्टांना शासनाची दाद; सर्वपक्षीय स्वीय सहाय्यकांकडून आ. मुनगंटीवार यांचा मुंबईत सत्कार

*Jyotsna Wankhede*: आमदारांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या कष्टांना योग्य सन्मान मिळावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने लावून धरलेल्या मागणीला अखेर शासनस्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांच्या स्वीय सहाय्यक तसेच वाहनचालकांच्या मासिक मानधनात प्रत्येकी १० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, ही वाढ १ ऑगस्टपासून लागू करण्यात आली आहे. या निर्णयानंतर सर्वपक्षीय स्वीय सहाय्यकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांची भाजपा प्रदेश कार्यालयात भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार केला.
नव्या निर्णयानुसार आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि वाहनचालक हे केवळ कार्यालयीन कर्मचारी नसून, आमदारांच्या दैनंदिन लोकसेवेच्या कार्यात खांद्याला खांदा लावून काम करणारे महत्त्वाचे सहकारी आहेत. नागरिकांच्या भेटी, पत्रव्यवहार, प्रशासकीय कामकाज, बैठका, दौरे आणि मतदारसंघाशी संबंधित विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा मोठा वाटा असतो. कामाचा वाढता व्याप आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात योग्य वाढ व्हावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी विधानसभेत ठामपणे मांडली होती.
आ. मुनगंटीवार यांनी या विषयाचा केवळ सभागृहात उल्लेख करून थांबले नाही तर शासनस्तरावरही पाठपुरावा केला. त्यांच्या या भूमिकेमुळे स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या अनेक वर्षांच्या अपेक्षेला आता शासननिर्णयाच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले आहे.मानधनवाढीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या कष्टाची आणि योगदानाची दखल घेण्यासाठी आवाज बुलंद करणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानण्यासाठी स्वीय सहाय्यकांनी भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांची भेट घेतली आणि सत्कार केला.
यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वीय सहाय्यकांनी व्यक्त केलेल्या प्रेमळ भावना आणि कृतज्ञतेबद्दल आभार मानले. ही केवळ मानधनवाढ नसून, आमदारांच्या लोकसेवेच्या कार्यात निष्ठेने आणि जबाबदारीने योगदान देणाऱ्या स्वीय सहाय्यक व वाहनचालकांच्या श्रमाचा आणि योगदानाचा सन्मान आहे, अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. आमदारांचे प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडताना स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यांच्या कामाचा वाढता व्याप आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी आपण विधानसभेत हा मुद्दा सातत्याने मांडला असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. या सहकाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या योग्य मोबदल्यासाठी घेतलेल्या भूमिकेला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समाधान आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.










