*तीन दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण व विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे चंद्रपूर पोलीस विभाग, पोलीस स्टेशन, चंद्रपूर यांच्या सहकार्याने तीन दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण व विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रज्ञा वाडेकर मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल, पोलीस स्टेशन, चंद्रपूर, तसेच मा. बळीराम पवार, हेड कॉन्स्टेबल, पोलीस स्टेशन, चंद्रपूर, मा. दिव्या कालिये मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल, मा. विना गेडाम मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल तसेच सर्व दामिनी पथक, चंद्रपूर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.
प्रमुख अतिथी मा. प्रज्ञा वाडेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श, तसेच समाजात घडलेल्या विविध घटनांची उदाहरणे देऊन अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. याचबरोबर शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी विद्यार्थिनींनी प्रशिक्षणातून घेतलेले धडे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात आणावेत, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांतर्गत जनजागृती रथामधील प्रोजेक्टरद्वारे सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती व महिला संरक्षण यासंबंधी माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात आली.
तसेच हेड कॉन्स्टेबल प्रवीण रामटेके, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक आडे, मार्शल आर्ट प्रशिक्षक वाजिद अली तसेच मार्शल आर्टचे विद्यार्थी साक्षी रणवीर, आर्यन रायपुरे व हसरत अली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व विविध प्रात्यक्षिके देण्यात आली.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच कार्यक्रमानंतर विद्यार्थी व शिक्षकांना ‘सुरक्षा मंत्र’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
प्रमुख अतिथी मा. प्रज्ञा वाडेकर मॅडम, दिव्या कालिये मॅडम व विना गेडाम मॅडम यांच्या उपस्थितीत शाळेतील तक्रार पेटीचे उद्घाटन/उघडणे करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन नझमी मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन शबाना मॅडम यांनी केले. कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा प्रकारे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा तीन दिवसीय कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.