*उद्योगाची परवानगी रद्द करा:- राजेश बेले*
*लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या प्रदूषणाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व MPCB समोर निषेध – 25 सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
एमआयडीसी घुग्घुस येथील मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. या लोह-प्रकल्पामुळे घातक वायू, रासायनिक घन कचरा व जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून उसगाव, घुग्घुस परिसरातील शेकडो एकर शेती उध्वस्त झाली आहे. वर्धा नदी व उसगाव नाला रासायनिक द्रव्याने प्रदूषित झाला आहे.
या गंभीर प्रकरणी दि. 16/09/2026 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, माननीय पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, माननीय जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक कार्यालय येथे कारखान्यातून बाहेर पडणारा रासायनिक घाण कचरा व रासायनिक जल टाकून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष राजेश बेले संस्थेने निवेदनात म्हटले आहे की, दि. 18/08/2026 रोजी उसगाव नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य सोडल्याने सुमारे 100 एकर शेती जास्ती प्रदूषित झाली आहे. तसेच ESP Dust (Dolachar) ची नियमबाह्य विक्री, सायंकाळी व रात्री हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे, ESP Dust ची रात्रीला वाहतूक व विक्री, सर्व हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा निकामी असणे, ग्रीस व कोळसा मिश्रित सांडपाणी सतत नाल्यात सोडणे, पर्यावरण मंजुरीपेक्षा दुप्पट उत्पादन घेऊन शासनाचा महसूल बुडवणे असे 10 गंभीर मुद्दे मांडण्यात आले आहेत.
या प्रकरणी MPCB चंद्रपूरचे अधिकारी – श्री. तानाजी यादव, सुशीलकुमार राठोड, नंदकिशोर लोमटे व स्वप्निल लिंगडे हे कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण करीत असल्याने त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी व निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कारखान्यावर कायदेशीर कारवाई करून पर्यावरण परवानगी रद्द न झाल्यास दि. 25/09/2026 शुक्रवार रोजी मुख्यमंत्री वर्षा बंगला, मुंबई समोर खालील कास्तकार आत्मदहन करणार आहेत, याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे.
*आत्मदहन करणारे कास्तकार:*
*1. श्री. मोहनदास धोंडूजी राजूरकर*
*2. श्री. वामन बापूजी राजूरकर*
*3. श्री. बंडू धोंडूजी राजूरकर*
*4. श्री. रामरतन बापूजी राजूरकर*
*5. श्री. सुधाकर मल्हारी ठाकरे*
*6. श्री. नितेश पांडुरंग ठाकरे*
*सर्व रा. उसगाव, तह. जि. चंद्रपूर*