राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 साठी अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर( जीमाका) :
राष्ट्राच्या निर्माणामध्ये युवकांची भुमिका महत्वपूर्ण असून मोठ्या संख्येने युवावर्ग/ संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे यासाठी राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार 12 जानेवारी 2013 पासून देण्यात येतात.
सन 2023-24 या वर्षात राज्यस्तरावर, राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभाग स्तरानुसार प्रत्येक विभागातील 1 युवक, 1 युवती व 1 नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक -युवती यांना रेाख 50 हजार रुपये व संस्थेस 1 लक्ष रुपये तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.
राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. सदर अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सदर करणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा http:/sports.maharashtra. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी केल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.