जुन्या झाडांचे फुटवे हेच झाडे दाखवून शासनाची फसवणूक
श्रेयश वानखेडे:
ब्रम्हपुरी तालुक्यातील बोदरा गावात ‘सामूहिक वन हक्क समिती’ व ‘राधा ऑर्गनायझेशन’ या सल्लागार संस्थेने मिळून वृक्ष लागवडीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. प्रत्यक्षात झाडे लावण्यात आलेली नसताना, मागील वर्षी लावलेली झाडांची पिलं म्हणजेच फुटलेले फुटवेच नव्याने लागवड केल्याचे दाखवण्यात आले आहे. ही संपूर्ण फसवणूक शासनाच्या नजरेतून दूर ठेवत बोगस मस्टरच्या आधारे शासकीय निधी उचलण्यात आला.
विशेष म्हणजे शेवगा या झाडाची फळधारणा नऊ महिन्यांत होते, परंतु येथे दोन वर्षांनंतरही झाड फक्त दोन फुटांपर्यंतही पोहोचलेले नाही. यावरून लागवड झालीच नसल्याचे स्पष्ट होते. शिवाय, मस्टरवर नावे असलेल्या अनेक मजुरांनी प्रत्यक्ष काम केलेले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. काहींना कामावरून काढण्याची धमकी देऊन गप्प बसविण्याचा प्रकारही घडल्याची माहिती समोर आली आहे.
बोदरा गावात दाखवलेली झाडे प्रत्यक्षात केवळ एका फुटापर्यंत उगवलेले फुटवे आहेत. याच फुटव्यांना नव्याने लावलेली झाडे म्हणून शासनाला दाखवले गेले आणि संपूर्ण निधी उचलण्यात आला. एकूणच, झाडांचे वय, उंची आणि वाढीच्या निरीक्षणावरून हे झाड मागील वर्षीचेच असून नव्याने लागवड करण्यात आलेली नाही, हे निर्विवादपणे स्पष्ट होते.
बोदरा ग्रामपंचायतीचे सर्व खाते मेंडकी येथील बँकेत असताना, वन हक्क समितीचे खाते मात्र ब्रम्हपुरी येथील विदर्भ कोकण बँकेत असून, कोणत्याही वेळी सल्लागार संस्थेला पैसे काढता यावेत, यासाठी हे खाते मुद्दाम ब्रह्मपुरीत उघडले गेले असावे, असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
झाडे आणण्यासाठी १२ हजार, खतासाठी २ लाख खर्च दाखवण्यात आले असून, गावातील प्रत्येक मजुराकडून अवैधपणे शंभर रुपयांचे हप्ते घेऊन ४ लाख रुपये गोळा करण्यात आले. याच रकमेतून झाडे व इतर खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यावरून शासनाकडून मिळालेला निधी कुठे गेला, हे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा भ्रष्टाचाराचा प्रकार केवळ बोदऱ्यापुरता मर्यादित नसून चोरटी, धामणगाव सह अनेक गावांमध्ये अशाच प्रकारे झाडे लावल्याचे दाखवून बोगस मस्टरवर पैसे उचलण्यात आले आहेत. काही ठिकाणी सामाजिक अंकेक्षणातही हा प्रकार उघड झाला असून, वृत्तपत्रातून याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर चोरटी येथे घाईघाईने एक दोन इंचाचे खड्डे तयार करून २१ जूनला झाडे लावण्यात आली. एका गावात १२ हजार झाडे लावण्याचा घोटाळा झाला असून आभास निर्माण करून भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी चोरटी येथे झाडे लावण्यात आली.
Box
प्रशासनाची भूमिका संशयास्पद
सतत निवेदने, तक्रारी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही. यावरून प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मस्टर तयार करणारे, देखरेख करणारे अधिकारी आणि सल्लागार संस्थेतील जबाबदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Box
जनसुनावणीत काय होणार?
आज होणाऱ्या जनसुनावणीत या कोट्यवधींच्या भ्रष्टाचारावर कारवाई होणार की नाही, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामसभा म्हणजेच लोकशाहीचा कणा मानला जातो, पण जेव्हा हिच ग्रामसभा लुटली जाते, तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. शासनाने या प्रकरणी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.