Thursday, April 16, 2026
Homeबल्लारपूरसंस्कार आणि ज्ञानाचा संगम घडवणारे शिक्षण काळाची गरज - आ. मुनगंटीवार
spot_img

संस्कार आणि ज्ञानाचा संगम घडवणारे शिक्षण काळाची गरज – आ. मुनगंटीवार

संस्कार आणि ज्ञानाचा संगम घडवणारे शिक्षण काळाची गरज – आ. मुनगंटीवार

भारतीय संस्कृती जगाला दिशा देणारी जीवनपद्धती

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

राज्यातील पहिल्या ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ अभ्यासक्रमाचा बल्लारपूर येथे शुभारंभ


Jyotsna Wankhede : भारतीय संस्कृती ही केवळ परंपरेपुरती मर्यादित नसून संपूर्ण जगाला दिशा देणारी जीवनपद्धती आहे. शिक्षणासोबत संस्कार, विज्ञानासोबत मूल्ये आणि राष्ट्रभक्तीची जाणीव यांचा संगम घडवणे ही काळाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला राज्यपाल कार्यालयाचे सचिव डाॅ. प्रशांत नारनवरे, भारतीय ज्ञान विज्ञानचे आचार्य दिनेश कुमार, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदावडेकर, भाग्यस केंद्राचे संचालक जितेंद्र कुमार तिवारी, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक प्रभाकर चव्हाण, भाजपा नेते चंदनसिंग चंदेल,बल्लारपूर एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डाॅ. राजेश इंगोले,उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड, व्यवस्थापन परिषद सदस्य पौर्णिमा मेहता, डॉ. प्रांजल बोगावार, चित्रा जोशी, सिनेट सदस्या डॉ. मंजुषा कानडे, प्राचार्य डॉ. निता लांबे, डॉ. सुशील मुंदडा, सन्मित्र सैनिक विद्यालयाच्या प्राचार्य अरुंधती कावडकर, अॅड. निलेश चौरे, डाॅ. दीनदयाल कावरे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण आदी उपस्थित होते

आ. श्री. मुनगंटीवार यांनी भारतीय संस्कृतीचे वैश्विक महत्त्व विषद करताना सांगितले की, ‘आज संयुक्त राष्ट्र संघही केवळ आर्थिक निकषांवर देशांची प्रगती न मोजता ‘हॅपिनेस इंडेक्स’च्या माध्यमातून मोजत आहे. आनंद, समाधान आणि कुटुंबव्यवस्था यांसारख्या मूल्यांचा विचार भारताने हजारो वर्षांपूर्वीच मांडला असून, हीच भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताची ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आणि सर्वसमावेशक संस्कृती जगासाठी आदर्श असल्याचे सांगत त्यांनी दीर्घकाळ परकीय आक्रमणांनंतरही भारतीय संस्कृती टिकून राहिल्याचा उल्लेख केला. मात्र, या संस्कृतीचा व्यापक प्रसार आणि शिक्षणात तिचा प्रभावी समावेश करण्यासाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज आहे.’

चीनसारख्या देशाचे उदाहरण देत त्यांनी शिक्षण आणि संस्कार यांचा समतोल साधल्यामुळेच काही राष्ट्रांनी वेगाने प्रगती साधली असल्याचे नमूद केले. तर गर्भसंस्कार आणि बालसंस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी लहानपणापासूनच होत असल्याचे स्पष्ट केले.इंग्रजी शिक्षणपद्धतीवर भाष्य करत त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत मूल्याधारित शिक्षणाचा अभाव असल्याची खंत व्यक्त केली. “मातृदेवो भव, आचार्य देवो भव” यांसारख्या संकल्पना केवळ पुस्तकांपुरता न राहता त्या प्रत्यक्ष आचरणात उतरायला हव्यात, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जगातील अनेक विद्यापीठांमध्ये संस्कृत आणि भारतीय ज्ञानप्रणालीचा अभ्यास होत असताना भारतीयांनीच आपल्या संस्कृतीपासून दूर जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रप्रेम, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम असलेले शिक्षणच देशाला प्रगत, सक्षम आणि मूल्यसमृद्ध बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक शिक्षण यांचा समतोल साधण्यास निश्चितच मदत करेल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.


Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page