ताडाळी एम आय डी सी येथे प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्रासाठी ५३. १५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार, सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलीत
चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाला नवे बळ
Jyotsna Wankhede: चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ताडाळी एम आय डी सी येथील प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्राच्या उभारणीला आता वेग मिळाला असून, महसूल व वन विभागाच्या दि. २ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पांतर्गत चार महत्त्वाच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या कामांसाठी एकूण ५३. १५कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा काष्ठ प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात नवे स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.या निर्णयामुळे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार आला असून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे.
या प्रकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, आ. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असतानाच या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. वनमंत्री पदाच्या कार्यकाळात आ. सुधीर मुनगंटीवार यांनीच या प्रकल्पाला मान्यता दिली असून त्यांच्याच हस्ते दि. 5 मार्च 2024 रोजी या प्रकल्पाचे भूमीपूजन देखील झाले होते.राज्यातील वनसंपत्तीचा शाश्वत व मूल्यवर्धित वापर व्हावा, तसेच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व्हावी, या दूरदृष्टीतून त्यांनी फर्निचर क्लस्टरची गरज ओळखून हा विषय शासन पातळीवर सातत्याने पुढे नेला. आज त्याच संकल्पनेला मूर्त रूप मिळत असून, त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे हे ठोस फलित आहे.
प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विकास कामांमध्ये मुख्य शेड-I (रु १४.७२ कोटी), कॅन्टीन ब्लॉक, स्किल डेव्हलपमेंट सेंटर व अंडरग्राउंड टँक (रु १३.१३ कोटी), केमिकल स्टोअर, मीटर रूम, गार्ड रूम, कंपाऊंड वॉल व अंतर्गत रस्ता (रु १०.८० कोटी) तसेच सीझनिंग शेड-२ व इलेक्ट्रिकल रूम (रु १४.५० कोटी) या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारणीचा समावेश आहे. सर्व कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूरचे मुख्य अभियंता यांची तांत्रिक मान्यता देखील प्राप्त झाली आहे.








