ज्योत्स्ना वानखेडे:
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा भंडारा यांची कार्यकारिणी सभा दिनांक ८ एप्रिल २०२६ ला आदर्श हायस्कूल, दवडीपार/बा येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीला नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी, विमाशी संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हा कोषाध्यक्ष धिरज बांते यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला तसेच शिक्षकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विमाशी संघटना स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असून शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील समस्यांच्या निराकरणासाठी ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भविष्यातही संघटना शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनीही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विमाशी संघटना ही शिक्षकांच्या समस्या सोडवणारी प्रभावी संघटना म्हणून ओळखली जाते. “आंदोलन हा संघटनेचा आत्मा आहे आणि पुढेही शिक्षकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार कार्य करण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी आगामी पदवीधर मतदार संघ तसेच अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सभेला जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.