Saturday, May 30, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपूरच्या टिंबर संग्रहालय–झायलेरियमसाठी बेंगळुरूतून नवे तंत्रज्ञान आणि नवी दिशा
spot_img

बल्लारपूरच्या टिंबर संग्रहालय–झायलेरियमसाठी बेंगळुरूतून नवे तंत्रज्ञान आणि नवी दिशा

बल्लारपूरच्या टिंबर संग्रहालय–झायलेरियमसाठी बेंगळुरूतून नवे तंत्रज्ञान आणि नवी दिशा

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पात १५० कोटींच्या प्रकल्पाला मिळाली होती मंजुरी
झायलेरियमसाठी तांत्रिक मार्गदर्शन, संशोधन आणि आधुनिक संकल्पनांवर सविस्तर चर्चा
चंद्रपूरच्या सागवान वारशाला जागतिक ओळख देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल


Jyotsna Wankhede : बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या टिंबर संग्रहालय–झायलेरियम प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात मिळालेली घोषणा आणि सुमारे १५० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मिळालेली गती ही राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे महत्त्वपूर्ण यश ठरले. विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे मांडत त्यानंतर शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा, प्रत्यक्ष बैठका आणि प्रकल्पासाठी आवश्यक पाठबळ उभारण्याचे काम आ. मुनगंटीवार यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बल्लारपूरच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर झाला.याच पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बेंगळुरू येथील लाकूड विज्ञान व तंत्रज्ञान संस्था तसेच भारतीय प्लायवुड औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे महत्त्वपूर्ण अभ्यास दौरा केला. हा केवळ अभ्यास दौरा नसून बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या टिंबर संग्रहालय–झायलेरियमच्या संकल्पनेला अधिक सक्षम, आधुनिक आणि जागतिक दर्जाची दिशा देणारा दौरा ठरला. संशोधन, तांत्रिक मार्गदर्शन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून बल्लारपूरचा प्रकल्प भविष्यात देशातील एक आदर्श केंद्र ठरण्याच्या दृष्टीने हा दौरा दिशादर्शक मानला जात आहे.

यावेळी बैठकीला संस्थेचे संचालक डॉ. शक्तीसिंह चौहान, विभागप्रमुख डॉ. मनोज कुमार दुबे, संशोधन समन्वयक राजेश एस. कल्लाई, संभाजी माने, मुख्य अभियंता सार्वजनिक प्रादेशिक विभाग नागपूर, सोनाली चव्हाण, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर ,मुकेश टांगले कार्यकारी अभियंता, संजोग मेंढे उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, विशाल माळी उपवनसंरक्षक वाहतुक व विपणन विभाग बल्लारपूर उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेत टिंबर संग्रहालय–झायलेरियम, लाकूड आधारित उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या नव्या संधींवर सखोल विचारमंथन करण्यात आले.यावेळी आय डब्ल्यू एस टी येथील शास्त्रज्ञांनी लाकूड व लाकडापासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचे संशोधनात्मक सादरीकरण केले. बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या टिंबर संग्रहालय–झायलेरियम प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि संकल्पनात्मक सहकार्य आय डब्ल्यू एस टी, बेंगळुरूमार्फत करण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

दौर्‍यादरम्यान आ. मुनगंटीवार यांनी चंदन रोपवाटिकेची पाहणी केली तसेच प्रगत लाकूड प्रक्रिया कार्यशाळेतील अत्याधुनिक यंत्रणा, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि संशोधन प्रकल्पांचा आढावा घेतला. रेडिओ फ्रिक्वेन्सी आधारित माहिती तंत्रज्ञानाशी जोडलेल्या संयुक्त संशोधन प्रकल्पाची पाहणी करून अशाच धर्तीवरील नाविन्यपूर्ण मॉडेल बल्लारपूरच्या टिंबर संग्रहालयात विकसित करण्याबाबत आ.मुनगंटीवार यांनी निर्देश दिले.

आ.मुनगंटीवार यांनी वूड–प्लास्टिक तंत्रज्ञान, वूड संग्रहालय, झायलेरियम आणि विविध चाचणी सुविधांची पाहणी करत विविध लाकडांची गुणवत्ता, ताकद आणि उपयोगिता याविषयी माहिती जाणून घेतली. चंद्रपूरच्या सागवानाचा वापर अयोध्येतील श्रीराम मंदिर, नवीन संसद भवन, भारत मंडपम, पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय सचिवालयासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या वास्तूंमध्ये झाला आहे. त्या ऐतिहासिक वारशाचे जतन करून त्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकार, संसदीय पाठपुरावा आणि दूरदृष्टीतून बल्लारपूर येथे उभा राहत असलेला टिंबर संग्रहालय–झायलेरियम प्रकल्प हा केवळ एक संग्रहालय नसून संशोधन, पर्यटन, वनाधारित उद्योग आणि स्थानिक रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ठरणार आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page