*ज्योत्स्ना वानखेडे*
केंद्र शासनाने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी तसेच महाराष्ट्र शासनाने 14 मे 2026 रोजी घेतलेला आरक्षणविरोधी निर्णय तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी रविवार, दिनांक 28 जून रोजी चंद्रपूर येथे ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी व एसबीसी समाजाच्या संयुक्त विद्यमाने भव्य महामोर्चा काढण्यात आला.
दुपारी सुमारे 1.00 वाजताच्या दरम्यान शहरातील गांधी चौकातून महामोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चामध्ये हजारो ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील नागरिक, युवक, महिला आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महामोर्चा गांधी चौकातून शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे झालेल्या सभेमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर,राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर,तेलगंना-आंध्रप्रदेश बिसी वेल्फेअर असो.चे श्रीनिवास जाजुला,शंकर अण्णा, शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पांडव, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण उर्फ बाळू खोबरागडे,आदिवासी विकास परिषदेचे प्रमोद बोरिकर यांनी संबोधित केले. या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती , भटक्या जमाती , आणि विशेष मागास प्रवर्ग व इतर संघटना सभेचे सूत्रसंचालन रामदास कामडी तर आभार प्रदर्शन पप्पू देशमुख यांनी केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ओबीसींची जातनिहाय जनगणना प्रत्यक्षात प्रभावीपणे करण्यात यावी तसेच महाराष्ट्र शासनाने 14 मे 2026 रोजी घेतलेला आरक्षणविरोधी निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली.
मोर्चानंतर , दिनेश चोखारे ,जयदीप रोडे, कृष्णा मसराम, राजेश खोबरागडे, आनंदराव अंगलवार,के.श्रीनिवास,विक्रम गौड, मनस्वी गीऱ्हे, किरण देरकर यांच्या शिष्ट मंडळाने उपनिवासी जिल्हाधिकारी डी.एस.कुंभार यांना निवेदन दिले. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप करण्यात आला.