*Jyotsna Wankhede*: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या महत्त्वपूर्ण तारांकित प्रश्नांना शासनाने दिलेल्या लेखी उत्तरांमधून पूर्व विदर्भातील कृषी शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुल (जि. चंद्रपूर) येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापनेची मागणी रास्त असल्याची शासनाने कबुली दिली असून, यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या दोन्ही उच्चस्तरीय समित्यांनी मुल अथवा सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविल्याचेही स्पष्ट केले आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत पूर्व विदर्भातील हवामान, मृदाप्रकार, पीकपद्धती व संशोधनाच्या गरजा पश्चिम विदर्भापेक्षा भिन्न असल्याने स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्यकता मूळ प्रश्ना द्वारे अधोरेखित केली. यावर उत्तर देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सन २०१३ व २०१५ मध्ये नेमलेल्या उच्चस्तरीय समित्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल अथवा सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापनेस अनुकूलता दर्शविली होती, अशी माहिती लेखी उत्तरात दिली आहे.
शासनाने सध्या आर्थिक दायित्वामुळे नवीन विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला असला, तरी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय तसेच संशोधन सुविधांच्या माध्यमातून कृषी शिक्षण सुरू असल्याचेही लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे. मात्र, समित्यांच्या सकारात्मक अहवालानंतरही स्वतंत्र कृषी विद्यापीठाचा निर्णय अद्याप न झाल्याचे उत्तराच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
नागपूरमधील स्वयंसेवी संस्थेतील महिला छळप्रकरणी दोषारोपपत्र दाखल
याच अधिवेशनात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ, अश्लील वर्तन आणि इतर गंभीर गैरप्रकारांबाबतही तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची, आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याची माहिती दिली.
तपासादरम्यान फिर्यादी महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करताना सीसीटीव्ही यंत्रणा बंद ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, समाजमाध्यमांवर बनावट खाते तयार करून महिला कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि मानसिक छळ केल्याची बाबही तपासात समोर आल्याचे शासनाने स्पष्ट केले. तसेच पीडित महिलेचे समुपदेशन करण्यात आले असून संबंधित संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करून धर्मादाय आयुक्त आणि आयकर विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही शासनाने दिली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या या दोन्ही प्रश्नांमुळे पूर्व विदर्भातील कृषी विकासाचा दीर्घकालीन प्रश्न आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेचा संवेदनशील विषय प्रभावीपणे सभागृहाच्या चर्चेला आला असून, शासनालाही त्याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी लागली आहे.
विशेषतः मुल येथील स्वतंत्र कृषी विद्यापीठाच्या मागणीला शासनाने समित्यांच्या अनुकूल अहवालाच्या माध्यमातून दुजोरा दिल्याने या मागणीला नव्याने बळ मिळाले असून, पूर्व विदर्भातील शेतकरी, विद्यार्थी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.