आमदार किशोर जोरगेवार यांच्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाला रक्तदान शिबिरांनी सुरुवात.
चार शिबिरांमध्ये ३४३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग, २३ जुलै पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

*Jyotsna Wankhede* : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, आज बुधवारी विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून या सप्ताहाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांना भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी भेट देण्याची पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले.
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह २३ जुलैपर्यंत विविध धार्मिक, सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांनी सुरू राहणार आहे. या कालावधीत मतदारसंघातील एकूण ५६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज पार पडलेल्या रक्तदान शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ३४३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपली. यात युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
भारतीय जनता पक्षाचे महामंत्री रविंद्र गुरुनुले यांनी तुकूम येथे, महामंत्री सविता दंढारे यांनी कृष्णनगर येथे, उमेश आयलू यांनी भाजप महानगर कार्यालयात, तर देवा कुंटा यांनी लालपेठ येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून सेवा सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या माध्यमातून रक्तदान, आरोग्य, धार्मिक, सामाजिक तसेच विविध जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सेवा, समर्पण आणि समाजकारणाचा संदेश देणारा देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिक व्यापक स्वरूपात साजरा होत असून, २३ जुलैपर्यंत विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून हा सेवा सप्ताह सुरू राहणार आहे.









