जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंश मृत्यूने मन हेलावले; माजी आमदार डॉ. देवराव होळींची आश्रमशाळेला भेट.
मृत विद्यार्थिनींच्या पालकांना दिला धीर; आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह सुविधांबाबत प्रशासनाशी सविस्तर चर्चा.
*ज्योत्स्ना वानखेडे*: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंशामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेची गंभीर दखल घेत भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींप्रति त्यांनी मनःपूर्वक दुःख व्यक्त करत त्यांच्या पालकांचे सांत्वन केले. दुःखाच्या या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचा विश्वास देत त्यांनी पालकांना धीर दिला.
या भेटीदरम्यान आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आरुषी सिंग व प्रकल्प अधिकारी एम. अरुण यांच्यासोबत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः खासगी व शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, वीज तसेच शाळा परिसरातील सुरक्षितता या विषयांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली.
आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणासाठी आश्रमशाळांमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि दर्जेदार वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी भूमिका माजी आमदार डॉ. होळी यांनी प्रशासनासमोर मांडली.
यानंतर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन मृत विद्यार्थिनींची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृत विद्यार्थिनींच्या पालकांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या.
या संपूर्ण घटनेबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने कार्यवाही करावी, तसेच घटनेची योग्य ती चौकशी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
“आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन आणि सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. जपतलाईसारखी दुःखद घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी भूमिका माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली.